पर्ल्स गुंतवणूकदारांचा उद्या सातार्‍यात मेळावा

सातारा, दि. 30 (प्रतिनिधी) : अखिल भारतीय पी. ए. सी. एल. (पर्ल्स) गुंतवणूकदार संघटनेने शनिवार, दि. 31 रोजी सकाळी 11 वाजता गोकूळ मंगल  कार्यालय, पोलीस मुख्यालयाजवळ सातारा येथे जिल्ह्यातील गुंतवणुकदारांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यास संघटनेचे निमंत्रक व बँक कर्मचारी  संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कॉ. विश्‍वास उटगी मार्गदर्शन करणार आहेत.
सातारा जिल्ह्यातील हजारो गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपये पी. ए. सी. एल. (पर्ल्स) कंपनीच्या चक्रानुवर्ती गुंतवणूक योजनांमध्ये अडकले आहेत. सर्वोच्च  न्यायालयाने दि. 2 फेब्रुवारी 2016 रोजी विशेष व अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णयाद्वारे न्यायामूर्ती लोढा यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून पर्ल्स कंपनीच्या सर्व  मालमत्तेची पारदर्शक विक्री करून 6 महिन्यात सर्व गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा आदेश दिला. कंपनीचे संचालक अटकेत आहेत. कंपनीची संपत्ती सेबीने  ताब्यात घेतली आहे.
संघटनेने गुंतवणुकदारांचे दावे अर्ज दाखल केले. मुंबई व दिल्ली येथे मोर्चे, निदर्शने, जेलभरो आंदोलने केली. आश्‍वासने मिळाली. परंतु अद्याप पैसे परत मिळाले  नाहीत. सातारा जिल्ह्यातील पर्ल्स गुंतवणुकदारांनी या मेळाव्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन संघटनेचे जिल्हा संघटक कॉ. शामराव चिंचणे  यांनी केले आहे.