Breaking News

५३७ कोटी रुपये मंजुर केल्‍याचा सरकारचा दावा खोटा : विखे

शिर्डी दि, ७ (प्रतिनिधी) – कर्जमाफीच्‍या संदर्भात राज्‍य सरकारने शेतक-यांची फसवणूक केली आहे. सरकारकडून कर्जमाफीचे सातत्‍याने बदलणारे आकडेच योजनेचे अपयश दाखवून देत आहेत. ४१ लाख शेतक-यांना १९ हजार ५३७ कोटी रुपये मंजुर केल्‍याचा सरकारचा दावा खोटा आहे. कर्जमाफी योजनेबाबत सरकारची भूमिका स्‍पष्‍ट नसल्‍यामुळेच राज्‍यातील शेतकरी कधी नव्‍हे तो इतका उध्वस्त झाला असल्‍याची टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.


या संदर्भात बोलताना विरोधी पक्षनेते ना. विखे पाटील म्‍हणाले की, मागील दस-यापासुन कर्जमाफीचं सरकारच तुनतुन सुरु आहे. सरकारचे फक्‍त तारीख पे तारीख सुरु आहे. दोनच दिवसांपुर्वी सहकार मंत्र्यांनी डिसेंबर अखेरपर्यंत कर्जमाफी केली जाईल असे सांगितले असतानाच काल अचानक ४१ लाख शेतक-यांची कर्जमाफी कशी झाली असा प्रश्‍न त्‍यांनी उपस्थित केला. ते म्हणाले, की सरकारने बॅंकांना लाभार्थ्‍यांची यादीच अद्याप दिलेली नाही. शेतक-यांच्‍या नावांमधील घोळ अद्याप संपलेला नाही.