शरद पवारांनी घेतली कोपर्डीतील पीडित कुटुंबाची भेट !

अहमदनगर, दि. 01 - कोपर्डी घटनेतील पीडितेच्या कुटुबीयांची रविवारी राष्ट्रवादी काँगे्रसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट घेतली, तसेच पीडित मुलीच्या बहिणीच्या शिक्षणाची सर्व जबाबदारी आपण घेत आहोत, असे देखील कोपर्डीत जाहीर केले. या घटनेचा निषेध व्यक्त करत,  न्यायालयीन प्रक्रिया लांबल्यानेच गुन्हेगारी वाढली आहे. न्यायालयीन प्रक्रियेवर पवारांनी यावेळी ताशेरे ओढले.
गावकर्‍यांशी बोलताना पवार म्हणाले की , अत्याचार करणार्‍या आरोपींना कठोर शिक्षा झाल्यास अशा घटनांना जरब बसेल. नवीन कायदा करण्यासाठी वेळ लागेल. त्यामुळे आहे त्या प्रचलित कायद्यानुसार आरोपींना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. कोपर्डीसारख्या अमानवी घटना रोखण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया तातडीने पुर्ण करायला हवी. दिल्लीतील घटनेनंतर जसा खटला जलदगतीने चालला, तसेच याही घटनेचा निवाडा जलदगती न्यायालयात व्हायला हवा. तरच गुन्हेगारांना चाप बसेल. यावेळी त्यांनी कायद्यात बदल करण्याची मागणी करणार्‍यांवरही आक्षेप नोंदवला. ते म्हणाले की, काही लोक कायद्याबद्दल बोलत आहेत. परंतु कायदा बदलणे, हे काही एखाद दुसर्‍या व्यक्तीच्या हातात नाही. त्यासाठी संसदेमध्ये चर्चा व्हावी लागते, त्यावर एकमत व्हाव लागते. समोरच्या बाजूचे म्हणणे एकून घ्यावे लागत. यावेळी त्यांनी कोपर्डी ग्रामस्थांचेही कौतुक केले. या गावाने दाखवलेला संयम कौतुकास्पद आहे, अभिनंदनीय आहे. काही विशिष्ट समाजाच्या नेत्यांना या गावात येण्यास मनाई करण्यात आली असे सांगण्यात आले. परंतु, मला तरी येथे येण्यास कोणाचाही विरोध झाला नाही असेही पवार यावेळी म्हणाले. यावेळी त्यांच्यासमवेत दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव नागवडे, आ. राहुल जगताप, आ. अरुण जगताप, जि.प. अध्यक्षा मंजुषा गुंड होते.