Breaking News

कोयना प्रकल्पग्रस्तांना नवी मुंबईत वाटप केलेल्या जमीन प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करणार - मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

राज्यातील प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्याबाबत समग्र धोरण तयार करण्यात येणार असून कोयना प्रकल्पग्रस्तांना नवी मुंबईत वाटप करण्यात आलेल्या जमिनीच्या प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल,अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.

या प्रकरणी विरोधी पक्षाने केलेले आरोप चुकीचे आहेत. प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहे. त्यासंदर्भातील कुठलीही फाईल मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

विधान सभेत नियम 97 अन्वये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यासंदर्भात चर्चा उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले, रायगड जिल्ह्यात पाच ठिकाणी 751 प्रकल्पग्रस्त आहेत. रायगड जिल्ह्यात 311 प्रकल्पग्रस्तांना पूर्णत: व 316 प्रकल्पग्रस्तांना अंशत: अशा 627 कोयना प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यात आली आहे. हे जमीन वाटपाचे अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना असून 2001 च्या अधिनियमानुसार प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्यात आली आहे.