गुगल व फेसबुकला प्रत्येकी एक लाखाचा दंड

नवी दिल्ली : सोशल मीडियावर लैंगिक शोषणासंबंधित व्हिडिओ ब्लॉक करण्यासाठी केलेल्या उपाययोजना सांगण्यात अपयश आल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने गुगल व फेसबुकसारख्या दिग्गज कंपन्यांना सोमवारी प्रत्येकी एक लाखाचा दंड ठोठावला आहे. याहू, फेसबुक, आयलँड, फेसबुक इंडिया, गुगल इंडिया, गुगल इंक, मायक्रोसॉफ्ट व व्हॉट्सॲप आदी कंपन्यांनी न्यायालयाच्या आदेशानंतरही उचित स्पष्टीकरण दिले नाही. तसेच त्यांनी कोणतेही दस्तावेज जमा केले नाहीत. याबद्दल न्या. मदन बी. लोकूर व यू.यू. ललित यांच्या खंडपीठाने वरील कंपन्यांना दंड आकारला आहे. न्यायालयाने वरील कंपन्यांना प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी येत्या १५ जूनपर्यंतची मुदत दिली आहे. आक्षेपार्ह व्हिडिओ रोखण्यासाठी कोणती पावले उचलली, याचा खुलासा यावेळी कंपन्यांना करावा लागणार आहे. तसेच दंडाची रक्कमही जमा करण्याचे खंडपीठाने बजावले आहे..