मुख्यमंत्र्यांचा सर्वांत मोठा विनोद !
यशवंतराव स्वातंत्र्य चळवळीतून पुढं आलेलं नेतृत्त्त्व होतं. त्यांनी विरोधकांचाही कायमच आदर केला. पत्नी निधनानंतर त्यांनी हाय खाल्ली. त्यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल करावं लागलं, त्या वेळी त्यांच्याकडंची शिल्लक रक्कम पाहिली, तर आजच्या काळातील नगरसेवक, सरपंचांकडं त्यापेक्षा अधिक रक्कम सापडेल.
यशवंतरावांचं वाचन अफाट होतं. त्यांनी वेणुताईशी केलेला पत्रव्यवहार पाहिला, तर त्यातून त्यांची विद्वता दिसते. यशवंतराव गटातटाच्या राजकारणापलीकडं होते. त्यांना पंतप्रधानपदाची संधी आली होती; परंतु आपल्यामागं खासदारांचं पुरेसं पाठबळ नाही, हे त्यांना माहीत होतं. त्यामुळं त्यांनी स्वत: होऊन संधी नाकारली. याबाबत शरद पवार व त्यांच्यातला फरक लक्षात घेण्यासारखा आहे.
पवार यांनीच एका समारंभात दोघांतला हा फरक सांगितला होता. पंतप्रधानपदाची मला संधी मिळाली असती, तर मी पहिलं पद पदरात पाडून घेतलं असतं आणि नंतर बहुमताचा ठराव मंजूर करून घेतला असता, असं पवार यांनी म्हटलं होतं. यशवंतराव यांनी मात्र तसं केलं नाही. संसदीय परंपरा मानणारा हा नेता होता. इंदिरा गांधी यांच्या 31 ऑक्टोबर 1984 ला झालेल्या हत्येनंतर देश धुमसत असताना 25 दिवसांनंतर यशवंतरावांनी या जगाचा निरोप घेतला. त्यामुळं त्या वेळी त्यांचं निधनही इंदिराजींच्या हत्येच्या सावटाखाली झाकोळलं गेलं.
यशवंतरावांनी सहकारी चळवळीचा पाया घातला. सहकारी साखर कारखाने, दूध संघ, खरेदी विक्री संघ, सूतगिरण्यांचं जाळं विणलं. सहकारात आपपरभाव त्यांनी कधीच जपला नाही. कृषीमालावर प्रक्रिया केली, तरच शेतकर्यांच्या हाती दोन पैसे जादा मिळतील, असं त्यांचं त्यामागचं गणित होतं. जिल्हा बँका, राज्य सहकारी बँक आदी संस्थांच्या उभारणीत ही त्यांचं योगदान होतं.
याउलट, सध्याच्या सरकारनं सहकारी चळवळीच्या नरड्याला नख लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न चालविला आहे. आतापर्यंतच्या सरकारांनी सहकार चळवळीतील दोषांना पाठीशी घातलं. त्याला मागचं युतीचं सरकारही तितकंच जबाबदार आहे. सहकारी संस्थांत गैरप्रकार करणर्यांवर अवश्य कारवाई करायला हवी. त्याबाबत दुमत असण्याचं काहीच कारण नाही; परंतु सहकारी संस्था आपल्या ताब्यात येत नाहीत ना, मग त्या कशा अडचणीत येतील, अशी परिस्थिती निर्माण करण्याचा सध्याच्या सरकारचा प्रयत्न आहे.
पाच वर्षांत अन्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा कायदा आहे; परंतु सहकारी संस्थांच्या निवडणुकाच न घेता त्या प्रशासकीय मंडळाच्या वर्षानुवर्षे ताब्यात देऊन त्यांची सूत्र आपल्याच बगलबच्यांच्या हातात देण्याचा प्रयन या सरकारनं चालविला आहे. सहकारी साखर कारखाने, दूध संघ, सूतगिरण्या अडचणीत येण्यास केवळ आर्थिक गैरप्रकारच कारणीभूत नसतात. देशांतर्गत व जागतिक परिस्थिती, पाऊस, भाव, कच्च्या मालाची उपलब्धता आणि सरकारी धोरणं अशी अनेक कारणं कारणीभूत असतात.
कर्ज न फेडण्यामागंही हीच कारणं असतात; परंतु त्याचा विचार केला जात नाही. जिल्हा बँकांच्या बाबतीत नोटाबंदीच्या वेळी घेतलेले उलटसुलट निर्णय, त्यांच्याकडं जमा झालेले पैसे स्वीकारण्यास दिलेला नकार, त्यानंतर त्यावरचं व्याज देण्यास चालविलेली चालढकल, बँकांचं झालेलं नुकसान, जिल्हा बँकांना पुरेशी रक्कमच उपलब्ध न करणं, अडचणीतील सहकारी साखर कारखान्यांची विक्री करणं आदी बाबी पाहिल्या, तर सरकारची सहकाराविषयीची भूमिका आढ्यताखोरीची आहे, हे लक्षात यावं. सहकारी दूध संस्थांना दूध खरेदी दराचं बंधन आणि खासगी संस्थांना मात्र मोकळीक असं एकाला एक व दुसर्याला दुसरा न्याय अशा प्रकारचं सरकारचं वागणं समर्थनीय नक्कीच नाही.
या पद्धतीनं सरकारचा कारभार चालू असताना महाराष्ट्रातील सध्याचं सरकार यशवंतराव चव्हाण यांना अभिप्रेत असलेल्या पद्धतीनंच कारभार करत असल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. यशवंतरावांचे मानसपुत्र असलेल्या शरद पवार यांनी त्याची खिल्ली उडवली नसती, तरच नवल. मुख्यमंत्र्यांचं हे विधान हा यंदाच्या वर्षातल सर्वात मोठा विनोद आहे, असं पवार यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची शनिवारी 33 वी पुण्यतिथी होती.
त्यामुळं राज्यातील दिग्गज नेत्यांनी कराड येथील प्रीतीसंगम या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन केलं. या वेळी यशवंतरावांच्या स्वप्नातील महाराष्ट्र घडवण्याचं काम सरकारकडून सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. महाराष्ट्रतील सामान्य माणसासाठी यशवंतराव चव्हाण यांनी जे स्वप्न पाहिलं, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम सध्याच्या सरकारकडून सुरू आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले होते.
फडणवीसांच्या या वक्तव्याची पवारांनी खिल्ली उडवली. चव्हाण साहेबांना अभिपˆेत असलेल्या विचारानं सध्याचं सरकार काम करत आहे, हे मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य हा या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे, असा टोला पवार यांनी लगावला. मुख्यमंत्री ज्या विचारधारेतून आले आहेत, त्या विचारधारेच्या जवळपाससुद्धा जाण्याचा विचार यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या आयुष्यात कधीही केला नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांचं आजचं विधान हा मोठा विरोधाभास आहे.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस यशवंतरावांना अभिवादन करायला तिथे गेले, याचा आनंद आहे. मात्र, चव्हाण साहेबांना अभिप्रेत असलेल्या विचारांवर सध्याचं सरकार चाललं आहे, हे वक्तव्य यंदाच्या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे, असं पवार यांनी म्हटलं आहे. शेतकरी व ग्रामीण भागाकडं ज्या पद्धतीनं हे सरकार पाहते, त्यावरून तरी ते यशवंतरावांना अभिप्रेत असलेलं काम करीत नाही, असं दिसतं.
Post Comment