पाणीपुरवठ्याची वीज तोडल्याने खेळखंडोबा .

अहमदनगर/ प्रतिनिधी । 25 :- दोन दिवसापूर्वी महावितरणने शहर पाणी योजनेची वीज तोडून मनपाला धक्का दिला होता. काही काळानंतर विज जोडली तरीही शहरातील पाणीपुरवठ्यावर याचा परिणाम झाला असल्याचे पहावयास मिळत आहे. शुक्रवारी शहर आणि उपनगरच्या काही भागास उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात आला. 


तसेच सारसनगर-बुरुडगाव भागाचा गुरुवारचा पाणीपुरवठा रद्द करुन त्यांनाही शुक्रवारी पाणी दिले गेले. वीज पुरवठा महावितरने तोडल्याने शनिवारी स्टेशन परिसर व आगरमळा भागास (दि.25 नोव्हेंबर) रोजी पाणी देण्याचे नियोजन करण्यात आले होते. 

मात्र काही ठिकाणी कमी दाबाने व तोकड्या प्रमाणात पाणी मिळाले. वीज पुरवठा खंडीत केल्याने मुळानगर, विळद पंपीग स्टेशन येथून शहरासाठी होणारा पाणी उपसा पूर्णतः बंद पडलेला होता. यातुन कमी दाबाने का होईना मनपाने पाणी देण्याचा प्रयत्न केला.

महापालिकेने पाणीयोजनेच्या वीजपुरवठ्याचे वीजबिल भरले नसल्याने महावितरणने गुरुवारी पाणी योजनेची वीज तोडली. विशेष म्हणजे दरवेळी महावितरणद्वारे केवळ मुळा धरण येथील मुख्य पाणी उपसा केंद्राचा वीजपुरवठा खंडित केला जातो. गुरुवारी मात्र मुळा धरणासह विळद जलशुद्धीकरण केंद्र व नागापूर-वडगाव गुप्ता उपकेंद्र अशा पाणी योजनेच्या तिन्ही वीजजोडांची वीज तोडली. 

त्यामुळे पाणीउपसा पूर्ण बंद पडला होता. यातुन पाणीप्रश्‍न गंभीर होण्याचे चित्र समोर ठाकले असताना. महावितरणच्या अधिकार्‍यांबरोबर प्रभारी आयुक्त भानुदास पावले यांनी चर्चा करुन हा प्रश्‍न मार्गी लावला. पालवे यांनी शब्द दिला की, लवकरात लवकर विज बीले अदा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करु. अखेर महापालिकेने धावपळ करून तातडीने 57 लाखांचा धनादेश जमा केला, तसेच 85 लाखांचा पुढील तारेखा धनादेशही महाविरणला दिला यानंतर गुरुवारी दुपारी विज जोडण्यात आली.

वीज वितरण कंपनीने गुरवारी दुपारी उशिरा पाणीपुरवठा सुरु केल्याने मुळानगर, विळद येथून टप्प्याटप्प्याने पाणी उपसा सुरु करण्यात आलेला असून पूर्ण क्षमतेने पाणी उपसा पूर्ववत होण्यास एक दिवस गेला आहे. तसेच 3 ते 3.30 तास पाणी उपसा बंद असल्याने पुरवठा व तद्नंतर पूर्ण क्षमतेने पाणी उपसा सुरु करणयास अवधी लागणार असल्याने शुक्रवार आणि शनिवारी काही प्रमाणता कमी प्रमाणात दाबाने पाणी मिळाले आहे. तसेच दि.24 तारखेला ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता तो दि.25 रोजी करण्यात आला आहे.

गुरुवारी दुपारी 12 च्या दरम्यान, महावितरणच्या अधिकार्‍यांद्वारे पाणी योजनेचा खंडित केलेला वीजपुरवठा दुपारी सुरू केला. मुळा धरणातून पुन्हा पाणीउपसा सुरू झाला, तरी पाईपलाइन मधील पाणी व हवेचा दाब नियंत्रित राहण्यासाठी टप्प्याटप्प्याने उपसा सुरू करावा लागला व पूर्ण क्षमतेने उपसा होण्यास सायंकाळी 7 नंतर सुरुवात झाल्याने दि.24 रोजी मंगलगेट, झेंडीगेट, डाळमंडई, काळू बागवान गल्ली, धरती चौक, माळीवाडा व कोठी, उपनगर सावेडी, गुलमोहोर रोड, प्रोफेसर कॉलनी परिसर, सिव्हील हडको, प्रेमदान हडको, म्युनिसिपल हडको आदी भागास उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यतात आला आहे. तसेच बुरुडगाव व सारसनगरचा गुरुवारचा पाणीपुरवठा रद्द करून त्यांना तो शुक्रवारी केला , तर शुक्रवारी पाणीपुरवठा होणार्‍या रेल्वे स्टेशन रोड, आगरकर मळा परिसरास शनिवारी पाणीपुरवठा करण्यात आला आहे.

पाण्याचे भवितव्य आता धनादेशावर 

शिष्टमंडळाच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर वीज जोडली असली तरी मनपा प्रशासनाने तातडीने आजच्या तारखेचा 57 लाखांचा धनादेश जमा केला तसेच 15 डिसेंबरपर्यंत मुदत असलेले 85 लाख रकमेचे आणखी काही धनादेश दिले. शहराच्या पाणी योजनेचा वीजपुरवठा महावितरण कंपनीने पूर्ववत सुरु केल असला तरी महापालिकेच्या धनादेशावर शहराचे पाणीपुरवठ्याचे भवितव्य आहे. धनादेश वटला नाही तर पुढील काळातही पुन्हा वीज तोडली तर पाणीव्यवस्थापन पुन्हा कोलमडण्याची भिती कायम आहे.