Breaking News

मुठा नदीकाठच्या सुशोभिकरणाचा आराखडा मनसेकडून पुण्यात सादर

पुणे, दि. 23, ऑगस्ट - शहराच्या मध्यातून जाणार्‍या मात्र, प्रदूषणामुळे मरणासन्न अवस्थेत असलेल्या मुठा नदीकाठच्या सुशोभिकरणाचा नाशिक मधील  गोदापार्क प्रकल्पाच्या धर्तीवर करण्याचा आराखडा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी पुण्यात सादर केला. 
त्यात बालगंधर्व ते म्हात्रेपूलादरम्यान नदीपात्राचे सुशोभीकरण आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या विकास आराखड्याचे ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत  सादरीकरण केले. विशेष बाब म्हणजे ठाकरे यांच्या या सादरीकरणासाठी राजकीय जोडे बाहेर ठेवत जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता  टिळक, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते श्रीनाथ भिमाले, आयुक्त कुणाल कुमार, विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनी पुर्ण वेळ उपस्थिती  लावली. यावेळी मनसेचे पालिकेतील गटनेते वसंत मोरेही उपस्थित होते.
राज्यातील मोठी शहरे वाढत्या नागरिकरणामुळे बकाल होत असून वाढत्या प्रदूषणामुळे नद्याही मरणासन्न अवस्थेत आहेत. अशा स्थितीत गुजरात मधील  साबरमती नदीकाठ सुधारणा प्रकल्पातून प्रेरणा घेत ठाकरे यांनी नाशिक मध्ये गोदाकाठ प्रकल्प खासगी सहभागातून यशस्वीरित्या राबविला आहे. त्याच  धर्तीवर शहरातील बालगंधर्व ते म्हात्रे पूलादरम्यान नदीपात्राचे सुशोभीकरण आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या विकसनाचा आराखडा तयार केला आहे. शहरातील  नदीपात्र कशा प्रकारे विकसित करता येईल?, त्यासाठी पैसे कसे उभे राहतील?, त्यासाठी किती खर्च येईल?, नदीप्रदूषणास कारणीभूत ठरणारे मैलापाणी  कसे रोखता येईल? आदी बाबींचा विचार या आराखड्यात करण्यात आला आहे. त्यासाठी राज्यातील अनेक कंपन्यांच्या सामाजिक बांधिलकी उपक्रमातून  (सीएसआर-कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी) निधी उभा करता येईल याच्या सादरीकरणासह आवश्यंक असलेल्या सर्व बाबींची सविस्तर माहिती ठाकरे  यांनी सादरीकरणावेळी दिली. शहराचा विकास करताना राजकीय पक्षांची लेबले बाजूला ठेवून विचार करायला हवा. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण  आणि श्रेयवादाचा प्रश्‍नप येता कामा नये. नदीपात्र आणि बालगंधर्व रंगमंदिराच्या विकास आराखड्यासंदर्भात पालकमंत्री, महापौर आणि आयुक्तांशी चर्चा  करणार असल्याचेही या वेळी ठाकरे यांनी बोलताना स्पष्ट केले.
अशी आहे नदीकाठ विकसनाची ब्लू प्रिंट
या वेळी करण्यात आलेल्या सादरीकरणात बालगंधर्व ते म्हात्रे पूलादरम्यानचा रस्ता आणि परिसर नवख्या स्वरुपात विकसित केला जाईल. त्यात  नदीकाठच्या बाजूला येणार्‍या छत्रपती संभाजी महाराज उद्यानाची रचना बदलून बसण्यासाठी आकर्षक कट्टे, मुलाखांसाठी खेळणी, नदीत ठिक ठिकाणी  बंधारे घालून नागरिक तसेच पर्यटकांसाठी नौका विहार, तसेच या सर्व परिसरात फिरण्यासाठी टॉय ट्रेन असेल या शिवाय ठिकठिकाणी लहान मोठी उद्याने  असतील.
पालिकेस करावा लागणार नाही खर्च
हा प्रकल्प तयार करताना; महापालिकेस कॉर्पोरेट सोशल रिसपॉन्सिबिलीटी ( सीएसआर) अंतर्गत कशा प्रकारे निधी उभारता येईल तसेच याच्या केवळ  देखभाल दुरूस्तीसाठी महापालिकेस खर्च उचलावा लागेल याचे सादरीकरणही ठाकरे यांनी केले. या प्रकल्पासाठी 840 कोटींचा खर्च अपेक्षीत असून  सीएसआर मधून तो उभारणे शक्यश असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.तर या भागात जाहीराती, मनोरंजनाची साधने तसेच इतर  उपक्रम राबविल्यास प्रती महिना अडीच कोटींचे उत्पन्न मिळणे शक्य असून या संपूर्ण प्रकल्पासाठी अवघा दिड कोटींचा देखभाल दुरूस्तीचा खर्च अपेक्षीत  असल्याचेही ठाकरे यांनी यावेळी निदर्शनास आणून दिले.