Breaking News

दक्षिण आफ्रिकेचा ऑस्ट्रेलियाला 5-0 ने व्हाईट वॉश

केपटाऊन, दि. 14 - डेव्हिड वॉर्नरच्या शानदार शतकी खेळीनंतरही ऑस्ट्रेलियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या आणि अखेरच्या वन डेत पराभवच स्वीकारावा लागला. केपटाऊनमध्ये झालेला हा वन डे सामना दक्षिण आफ्रिकेने 31 धावांनी जिंकला आणि मालिकेतही 5-0 असे निर्भेळ यश मिळवले आहे.
या सामन्यात रिली रोसूच्या 122 आणि जेपी ड्युमिनीच्या 73 धावांच्या खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने 50 षटकांत 327 धावांची मजल मारली होती. विजयासाठी 328 धावांचा पाठलाग करताना वॉर्नरने 136 चेंडूंत 173 धावांची स्फोटक खेळी केली. त्याच्या या खेळीमध्ये 24  चौकारांचा समावेश होता.
वॉर्नरचा अपवाद वगळता ऑस्ट्रेलियाचे बाकीचे फलंदाज 35 धावांचा पल्लाही ओलांडू शकले नाहीत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाचा डाव 48 षटके आणि दोन चेंडूंमध्ये 296 धावांवरच आटोपला. या पराभवानंतरही ऑस्ट्रेलियाने वन डे क्रमवारीतले अव्वल स्थान कायम राखले आहे. मात्र दुसर्‍या स्थानावरील दक्षिण आफ्रिका ऑस्ट्रेलियापेक्षा केवळ दोनच गुणांनी पिछाडीवर आहे.