सांगलीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा राजकीय बालेकिल्ला नेस्तनाबूत करण्यात भाजपला यश

सांगली, दि. 24 - सांगली जिल्ह्यातील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा बुलंद राजकीय बालेकिल्ला नेस्तनाबूत करण्यात भारतीय जनता पक्षाला यश आले असून जिल्हा परिषदेच्या 60 जागांपैकी भाजपने 25 जागा प्राप्त करून सर्वाधिक जागा मिळविल्या आहेतच; पण स्वाभिमानी आणि अपक्षांच्यासाथीने 31 जागा मिळवून सांगली जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचे स्वप्नही त्यांचे पुरे होणार आहे.
जिल्हा परिषदेत काँग्रेसला केवळ सात जागा मिळाल्या असून गत सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसलाही 16 जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिवसेनेनेही आपले खाते उघडले असून आटपाडी तालुक्यात शिवसेनेला तीन जागा मिळाल्या आहेत. तर भाजपशी युती केलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेलाही दोन जागा मिळाल्या आहेत. रयत विकास आघाडीनेही चार जागांवर विजयी संपादीत केला असून राष्ट्रवादीचे बंडखोर संभाजी कचरे हे अपक्ष म्हणून बागणी मतदारसंघातून विजयी झाले आहेत.
जिल्हा परिषदेच्या स्थापनेपासून गत पाच वर्षाचा कालावधी सोडला तर पाशवी संखेने काँग्रेसची सत्ता अबाधीत होती. गत निवडणुकीत राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत क्रमांक एक चा पक्ष म्हणून स्थान मिळवल्यानंतर काँग्रेसबरोबर आघाडी करीत पुन्हा सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची स्थापन झाली होती. मात्र या निवडणुकीत पुर्ण ताकतीनिशी उरलेल्या भाजपने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला नेस्तनाभूत करीत सांगली जिल्हा परिषदेवर आपला झेंडा फडकविला आहे.
भाजपच्या या यशात ग्रामीण जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, जतचे आमदार विलासराव जगताप यांच्याबरोबरीनेच राष्ट्रवादीतून भाजपात नुकतेच दाखल झालेले आटपाडीचे राजेंद्र आण्णा देशमुख यांचा सिंहाचा वाटा आहे. खासदार संजयकाका पाटील यांना मात्र त्यांना त्यांच्या तासगाव तालुक्यात अनपेक्षीतपणे पराभवाला सामोरे जावे लागले. या तालुक्यात राष्ट्रवादीने चार जागा मिळविल्या तर भाजपला केवळ दोन जागांवर समाधान मानावे लागले. तासगाव पंचायत समितीवरही राष्ट्रवादी काँग्रेसने कब्जा मिळवला असून 12 सदस्यांपैकी सात जागा तर भाजपला पाच जागा प्राप्त झाल्या आहेत.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यानंतर काहीकाळ विधानपरिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्यानेतृत्वाखाली काँग्रेसने सामुहिक नेतृत्व दिले होते. परंतू गेल्या दहावर्षापासून या जिल्ह्यावर काँग्रेसचे नेतृत्व म्हणून पतंगराव कदम यांनी काम पाहिले आहे. जिल्ह्यात भारतीय जनता पक्ष प्रबळ होत असताना पतंगराव कदमांचे नेतृत्व नेस्तनाबूत ठरले आहे. एवढेच नव्हे तर त्यांच्या हक्काच्या पलूस कडेगाव मतदारसंघात भाजपने बाजी मारली आहे. पतंगरावांचे जावाई महेंद्र लाड यांना कुंडल मतदारसंघातून पराभव स्विकारावा लागला आहे.
वाळवे तालुक्याचे अनभिज्ञ सम्राट म्हणून जयंतरावांची ओळख गेली 15 वर्षे होती. परंतू नुकत्याच झालेल्या इस्लामपूर नगरपरिषदेच्या पाठोपाठ त्यांना आता वाळवे-शिराळा तालुक्यातही अपेक्षीत यश मिळू शकले नाही. जयंत पाटील यांच्या विरोधात गेले काही दिवस राजकीय साखरपेरणी करणारे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांना बागणी जिल्हा परिषद मतदारसंघात पराभवच स्विकारावा लागला नाहीतर ते तिस्या क्रमांकावर फेकले गेले. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बंडखोर संभाजी कचरे यांनी तालुक्याचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांचे चिरंजीव वैभव शिंदे यांचा पराभव केला.
 आटपाडी तालुका हा आपल्या वर्चस्वाखाली आहे हे माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुखांनी पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविले आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतर ते भाजपमध्ये दाखल झाले आणि आपल्या समर्थकांना त्यांनी निवडूनही आणले. जत तालुक्यातही आमदार विलासराव जगताप यांनी भारतीय जनता पक्षाला घवघवीत यश मिळवून दिले. विटा-खानापूर तालुक्यात शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना आपला गढ शाबूत ठेवण्यात यश प्राप्त झाले.
 माजी गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या आकस्मीत निधनानंतर यातालुक्यात खिंडार पाडण्यात भाजपला यश मिळाले होते. अनेक दिग्गज भाजपमध्ये दाखल होऊनही आर. आर. पाटील यांच्या पत्नी आमदार सुमनताई पाटील यांनी राष्ट्रवादीला विजय प्राप्त करून दिला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांनी आघाडी करीत यातालुक्यात आपले अस्तित्व दाखवून दिले आहे. शिराळा तालुक्यात भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक व स्वाभिमानी शेतकरी संघटनेला पराभवाला सामोरे जावे लागले.
सांगली जिल्हा परिषदेत भाजपने स्वबळावर सत्ता मिळवली आहे. आमच्या सोबत स्वाभिमानी शेतकरी संघटना व रयत आघाडीच्या सदस्यांना घेऊन अध्यक्षपदी भाजपचाच सदस्य विराजमान होणार आहे, असे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी हिंदुस्थान समाचारशी बोलताना सांगितले. शिवसेनाच्या तीन सदस्यांचा पाठिंबाही भाजपला असेल, असा दावाही त्यांनी केला. शहरा बरोबरच आता ग्रामीण भागातील जनताही भाजपच्या विचाराने प्रेरीत झाली आहे. येत्या पाच वर्षात जिल्ह्यात अमुलाग्र बदल करून स्वच्छ व गतीमान नेतृत्व देण्याचा प्रयत्न भाजप करणार आहे.