महागाईचा वणवा !

देशातून भ्रष्टाचार, साठेबाजी, लाचखोरी सर्वकाही नष्ट होईल आणि महागाई संपुष्टात येईल असे आश्‍वासन देऊन निवडणूक प्रचारात वापरलेली सर्वात प्रमुख घोषणा-‘अच्छे दिन आने वाले हैं’मुळेही सर्वांना आशा लागली. परंतु मोदी सरकारला सत्तेत येऊन दोन वर्ष झाली आहेत. उपरोक्त जेवढ्या समस्या यूपीएच्या राजवटीत होत्या त्या सर्व समस्या आधीपेक्षा वाढत चालल्या आहेत. वास्तविक यावर उपाययोजना करण्यापेक्षा अर्थमंत्री आकडेवारी देवून महाबाईची बोळवण करतांना दिसून येत आहे. लोकसभेत खा.राहूल गांधी यांनी महागाईचा मुद्दा उपस्थित केला. ‘जो डाळ पिकवतो त्याला 50 रुपये व तीच डाळ बाजारात 180 रुपयाला विकली जाते. डाळी, भाज्या सर्व काही महागले आहे, महागाई कमी करण्याचे आश्‍वासन कुठे गेले? ‘मा बच्चे रातभर रोते है, आसू पिकर सोते है,‘ हा मोदींचा डायलॉग होता, गांधी यांनी मोदींनाच ऐकवला. महागाईने सर्वसामान्य त्रस्त झाले तरी, सरकारकडून जास्त मनावर घेतले जात नाही, कारण लगेच मागील संपुआ सरकार, आणि आताच्या रालोआ सरकारची तुलना करायची, आकडेवारी द्यायची इतकेच दोन वर्षात लोकसभेत सर्वसामान्यांना दिसून येत आहे. महागाईने मनमोहन सिंग सरकारच्या काळातील महागाईचा उच्चांक तोडला आहे. देशातील जनता अजूनही अंधारात ’अच्छे दिन’ शोधत आहे. मात्र त्याची चाहूलही लागत न नसल्यामुळे जनतेला आपण फसवले गेल्याचे वाटत आहे. आज तुम्ही मोदी सरकार समर्थकांना किंवा स्वयंभू तथाकथित राष्ट्रवाद्यांना विचारले की, तुमचे महागाई दूर करण्याचे आश्‍वासनाचे काय झाले, तर उत्तर मिळेल की, जगात देशाची मान उंचावत आहे आणि तुम्ही आलू-कांदे, टमाटर आणि डाळीच्या महागाईसारख्या तुच्छ गोष्टींत अडकून पडलात? म्हणजे देशातील गरीब जनता जी आपल्या मजुरीने दोनवेळच्या जेवणाची सोय करू शकत नाही तिला या गोष्टीने समाधान मानण्यास सांगितले जात आहे की, तुमचे पंतप्रधान जिथे जिथे जात आहेत तिथे भाड्याचे टट्टू मोदी-मोदीचे नारे देऊन देशाची मान उंचावत आहेत? भारतीय जनता पार्टी विषयी सर्वसामान्य धारणा आहे की, ही पार्टी तसेच तिचे सरकार व्यापार्‍यांचे हित लक्षात घेणारी पार्टी व सरकार आहे. निवडणूक प्रचारात मोदी उद्योगपति अदानीसोबत विमानात फिरत होते त्यावेळी अरविंद केजरीवालांनी जनतेला सावधही केले होते. परंतु देशातील बिचारी जनता मनमोहन सिंगांच्या शासनातील भˆष्टाचार व महागाईने एवढी दुखावली होती तसेच मोदींच्या भाषणांत व त्यांच्याकडून दिल्या जाणार्‍या मोठमोठ्या आश्‍वासनात एवढी अंध झाली होती, की तिला वास्तवाची कसलीही जाण राहिली नाही. मात्र आज देश ते वास्तव बघत आहे. मोदी सरकार कॉर्पोरेट जगतातील लोक तसेच उद्योगपतींच्या हितांची काळजी घेत आहेत. गरीबांचे जगणे कठीण करणार्‍या महागाईला नियंत्रित करण्याकडे मात्र लक्ष देत नाहीत. रेडियोवर दर महिन्याला होणार्‍या ‘मन की बात’ कार्यक्रमातही केवळ भाषणबाजी ऐकायला मिळते. विविध उपदेश केल जातात. आपल्या मनातील बात केली जाते मात्र जनतेच्या मनातील गोष्टीविषयी तोडगा काढला जात नाही. सत्तेचे पूर्ण लक्ष देशात सांप्रदायिक धुवीकरण करण्याकडे लागले आहे. विरोधी पक्षही भाजपाच्या धर्म आधारित धुवीकरण करण्याच्या या जाळ्यात अडकलेला दिसत आहे. महागाई वाढण्याचे जेे प्रमुख कारण असतात त्यात दैनंदिन वापरातील वस्तु जसे आलू-कांदा तसेच डाळींचा उत्पादनावेळीच साठेबाजी करणे तसेच नंतर या वस्तुंची टंचाई झाल्यावर त्या दामदुपटीने विकणे ही महागाईची प्रमुख कारणे आहेत. आता ही सरकारची जबाबदारी आहे की, त्याने साठेबाजीला आळा घालावा, दलाली व कमीशनच्या नावावर कोणत्याही वस्तुचे मूल्य मर्यादेपेक्षा वाढू देऊ नये, आंतरराष्ट्रीय बाज़ारात कच्च्या तेलाच्या निर्धारित किंमतीनुसारच देशात तेलाचे मूल्य निर्धारित करावे. शेतकर्‍यांना योग्य मूल्यांने बीयाणे,खते, पोस्िंटसाईट,वीज व पाणी उपलब्ध करून द्यावे. साठेबाज व दलालांकडून होणार्‍या लूटीपासून जनतेला दिलासा देत त्याचा लाभ शेतकरी तसेच ग्राहकांपर्यंत पोचविण्याची व्यवस्था करावी. आज विविध डाळींचा भावा 180 रुपयांच्या आसपास पोचला आहे. साधारण भाजीपाला साठ रुपये ते शंभर रुपये किलोने विकला जात आहे. साबण-तेल,पेस्ट,मिठ,मिरची-मसाले आदि सर्व महाग होत आहेत. म्हणजे महागाईपासून दिलासा मिळणे तर दूरच उलट जनतेला महागाईची मार आधीच्यापेक्षा जास्त तीवˆतेने सोसावी लागत आहे.