झाले तेव्हढे पुरे...!

शिवसैनिकांच्या हत्याकांडावरून जिल्ह्याचे तीन आमदार चर्चेत येणे ही जिल्ह्याच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला भुषणावह नाही. नगर जिल्ह्याच्या वाट्याला ही शोकांतिका यावी? जे दिसते तेच, किंवा जे चर्चेत ठेवले जात आहे तेच वास्तव आहे की पुन्हा यामागेही काही राजकारण आहे? काहीही असो, पण जे चाललय ते नगरच्या संस्कृतीला आणि प्रकृतीला परवडणारे नाही. अशीच सामान्य नगरकरांची भावना आहे.
.....................................................................................
अहमदनगर जिल्ह्याकडे अवघ्या महाराष्ट्राची पाहण्याची दृष्टी दमदार नेतृत्वाची जिल्हा म्हणून आहे. स्वातंत्र्योत्तर काळापासून या जिल्ह्याने काल परवापर्यंत आपला हा रूतबा कायम ठेवला होता. तथापी अंतर्गत कुरबुरींमुळे पारंपारिक प्रतिस्पर्धीच नव्हे तर स्वकीयही मतभेदापासून मनभेदांच्या वळचणीत अडकल्याने  या रूतब्याचा बळी कधी घेतला याचा नगरकराना पत्ता लागला नाही. खरेतर, हे जिल्ह्याचे केंद्र असलेल्या या शहरात सर्वच पक्षांचे दिग्गज नेते कार्यरत आहेत. प्रत्येकामध्ये आपली स्वतःची अशी सक्षम यंत्रणा आहे. या यंत्रणेला जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात साम्राज्य निर्माण केलेल्या आणि राज्याच्या राजकारणात दबदबा असलेल्या नेत्यांचे भक्कम पाठबळ आहे. ही सारी यंत्रणा खर्‍या अर्थाने शहर विकासाच्या कारणी लावणे या मंडळींच्या कक्षेत आहे, प्रत्यक्षात घोडे कुठे पेंड खात बसते. हे न उलगडलेले कोडे कुणाच्या तरी हत्येने चर्चेत येते. एरवी सामान्य नगरकर आणि भाईंच्या जातकुळीतील कार्यकर्ता या नेत्यांसोबत फरफटत राहतो. नगरची मुळ प्रकृती गुन्हेगारी स्वरूपाची नव्हती. संघर्षाची उर्मी मात्र नसानसात ठासून भरली होती. मात्र स्वातंत्र्याची पन्नाशी उलटू लागल्यानंतर संघर्षाची या उर्मीला विशेषतः तारूण्याला योग्य दिशा देण्यात शहर आणि जिल्हा नेतृत्वाला अपयश आले आणि त्यातूनच गुंडगीरी आणि राजकीय गुन्हेगारांची एक वेगळी जमात पोसण्याचा वसा शहराने जपला. कालचे प्रकरण सर्वच अर्थाने दुर्दैवी आणि तितकेच हीन आहे. निष्पाप कार्यकर्त्यांची हत्या होणे जेव्हढे दुर्दैवी आहे तेव्हढेच या घटनेचे राजकारण करणे अशोभनीय आहे. पुरोगामी महाराष्ट्राची ही परंपरा नाही. अहमदनगर जिल्हा पुरोगामी विचारांचा उदगाता आहे हे याची आठवण करून द्यावी लागणे हे आम्हा नगरकरांचे दुर्भाग्य. झाला तेव्हढा तमाशा पुरा झाला. भिक नको पण कुत्रे आवरा अशी पश्‍चातापदग्ध भावना नगरकर व्यक्त करीत आहेत. कुठला एक राजकीय पक्ष किंवा राजकीय नेता या परिस्थितीला जबाबदार नाही तर सर्वच या पापाचे वाटेकरी आहेत. हे वास्तव स्वीकारण्याचे धाडस दाखवून सर्व नेतेमंडळींनी शहर जिल्ह्याच्या विकासासाठी रक्ताचे खाळ खेळण्यापेक्षा खेळीमेळीचे राजकारण करून जिल्ह्याची परंपरा महाराष्ट्रासमोर नव्याने ठेवण्याची गरज आहे. तरूणाईच्या उर्जेला सकारात्मक दिशा दिली गेली तर या शहर विकासाच्या गाड्याला उटी लावण्याचे धाडस कुणी करणार नाही म्हणून डावे उजवे विचारसरणी जपणार्‍या मंडळींनी आडव्या तिरप्या चाली खेळून तरूणांना शस्राला धार लावण्यास प्रवृत्त करण्याऐवजी त्यांची उर्जा तुमच्या पाठीशी उभी करून विकासाचे सारथ्य करा. हीच सामान्य नगरकरांची आर्त हाक आहे.