Breaking News

महाआरोग्य शिबीरात दोन हजार रूग्णांची तपासणी


 जळगाव/प्रतिनिधी। 6 - शहरात पुढील आठवड्यात होणार्‍या महाआरोग्य शिबिराची पूर्वतयारी म्हणून सध्या प्रभागनिहाय सुरू असलेल्या आरोग्य तपासणीत दोन हजार रुग्णांची तपासणी करण्यात आली. यातून साडेतीनशे रुग्ण शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले.
शहरातील सागर पार्क मैदानावर 9 जानेवारीपासून महाआरोग्य शिबिराचे आयोजन केले आहे. या शिबिराची पूर्वतयारी म्हणून शहरातील विविध भागांत आरोग्य तपासणी सुरू आहे. या तपासणीसाठी मुंबई, नागपूरहून तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक दाखल झाले आहे. आरोग्य तपासणीचा आज तिसरा दिवस होता. तीन पथकांकडून शहरातील पाच ठिकाणी आज रुग्ण तपासणी करण्यात आली. यात खंडेरावनगर, आशाबाबानगर, हरिविठ्ठलनगर, चांदणी चौक (शिवकॉलनी), ज्ञानदेवनगर या भागांमध्ये तपासणी झाली.
शहरातील पाच भागांमध्ये झालेल्या तपासणीत साधारण दोन हजार जणांची ओपीडी झाली. यातून वेगवेगळ्या शस्त्रक्रियांसाठी साडेतीनशे रुग्ण पात्र ठरले. सदर तपासणीत मुंबईचे 14, नागपूर येथून 7 आणि जळगावच्या 10 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम होती.
ग्रामीणमधून हजार शस्त्रक्रियांचा संकल्प - मुकेश सोनवणे
जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने आयोजित मोफत महाआरोग्य शिबिरात ग्रामीणमधून एक हजार मोफत शस्त्रक्रिया करून देण्याचा संकल्प मुकेशभाऊ सोनवणे बहुजन एकता महासंघाचे अध्यक्ष मुकेश सोनवणे यांनी केला आहे. तसेच मोहाडी व कानळदा येथे काल रक्तदान शिबिर घेऊन 300 बाटल्या रक्त संकलन केले.