Breaking News

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना विविध विद्यालयांत अभिवादन


 जळगाव/प्रतिनिधी। 6 - स्त्री शिक्षणाचे महत्त्व पटवून देणार्‍या आद्यशिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिकादिन म्हणून साजरी करण्यात आली. यानिमित्त शहरातील विविध शाळा, संस्थांतर्फे प्रतिमा पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
र. सो. काळे प्राथमिक विद्यामंदिर
ज्ञानसाधना शिक्षण प्रसारक मंडळ संचलित र. सो. काळे प्राथमिक विद्यामंदिरात मुख्याध्यापिका देवयानी बेंडाळे यांनी सावित्रीबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शाळेतील विद्यार्थी वैशाली सोनवणे, प्रियंका महाजन, पुष्पा महाजन, दुर्गा खैरे यांनी सावित्रीबाई यांच्या जीवनकार्यावर भाषण केली. कार्यक्रमास शिक्षक मिलिंद वाघुळदे, रविकांत वाघोदे, गोविंदा भोळे, किरण सावकारे, स्नेहा जावळे आदी उपस्थित होते.
जैन प्राथमिक विद्यालय
दि. पूर्व खानदेश हिंदी शिक्षण संस्था संचलित स्व. शेठ बी. एम. जैन प्राथमिक विद्यालयात मुख्याध्यापक भास्कर फुलपगार यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम झाला. सर्वप्रथम प्रतिमेस माल्यार्पण व पुष्प अर्पण करण्यात आले. देवयानी जाधव यांनी सावित्रीबाई यांनी केलेल्या कार्याचा जीवन परिचय करून दिला. यानिमित्ताने विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
बहिणाबाई विद्यालय
बहिणाबाई ज्ञानविकास संस्था संचलित प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती बालिका दिन म्हणून साजरा करण्यात आला. कार्यक्रमास संस्थाध्यक्ष बंडू काळे, सचिव जनार्दन रोटे, प्राथ. मुख्याध्यापक आर. एम. महाजन, माध्य. मुख्याध्यापक टी. एस. चौधरी उपस्थित होते. प्रतिमा पूजन करून अभिवादन केले. यानंतर शाळा स्तरावर मुलींच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. कार्यक्रमाला शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बालनिकेतन विद्यामंदिर
प्रगती शिक्षण मंडळ संचलित बालनिकेतन विद्यामंदिरात मुख्याध्यापिका शालिनी भंगाळे, ज्येष्ठ शिक्षक डॉ. रवींद्र माळी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन झाले. कार्यक्रमात शाळेतील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातील प्रसंग, त्यांचे शिक्षण विषयक विचार व महिलामुक्ती दिन अशा विषयांवर आपली मते मांडली.
महाराणा प्रताप विद्यालय
दि पूर्व खानदेश हिंदी शिक्षण संस्था संचलित महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षिकादिन साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका साधना शर्मा अध्यक्षस्थानी होत्या. तर उपमुख्याध्यापक डी. एस. पाटील, पर्यवेक्षक डी. बी. सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रतिमा पूजनानंतर विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याविषयी भाषणे केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया
तालुकाध्यक्ष रमा ढिवरे यांच्या रामेश्‍वर कॉलनीतील संपर्क कार्यालयात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी महानगराध्यक्ष अनिल अडकमोल, जिल्हा उपाध्यक्ष नितीन आसमार, महानगर कार्याध्यक्ष सागर सपकाळे, लता वाघ, प्रमिला माळी, वैशाली चौधरी आदी उपस्थित होते.
महावितरणचे जळगाव परिमंडळ
महावितरणच्या जळगाव परिमंडळ कार्यालयात मुख्य अभियंता जे. एम. पारधी यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी जळगाव मंडळाचे उपकार्यकारी अभियंता मधुकर भंगाळे, भुसावळ विभागाचे उपव्यवस्थापक आर. एम. गोसावी, मुख्य लिपिक सुभाष पाटील, कामगार विभागाचे दीपक कोळी, राजेश अहेर, विठ्ठल तायडे उपस्थित होते.