अध्यात्मिक गुरू दादा वासवानी यांचे निधन आज होणार अत्यंसंस्कार ; अध्यात्मिक क्षेत्राची हानी
पुणे : प्रसिद्ध अध्यात्मिक गुरू आणि साधू वासवानी मिशनचे संस्थापक दादा वासवानी यांचे गुरूवारी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ते 99 वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने अध्यात्मिक क्षेत्राची मोठी हानी झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी वासवानी मिशनमध्ये ठेवण्यात येणार असून, शुक्रवारी त्यांच्यावर अत्यंसंस्कार करण्यात येणार आहे. सिंधी समाजाचे धार्मिक गुरू म्हणून दादा वासवानी यांची ओळख होती. 2 ऑगस्ट 1918 रोजी हैदराबादमध्ये त्यांचा जन्म झाला होता. त्यांनी आयुष्यभर शाकाहाराचा प्रचार-प्रसार करतानाच प्राण्यांच्या जतन आणि संवर्धनासाठीही मोठं काम केलं होतं. त्यांनी अध्यात्मावर एकूण 15 पुस्तके लिहिली आहेत. शिकागो येथील जागतिक धर्म संसद आणि न्यूयॉर्क येथील जागतिक शांतता परिषदेला त्यांनी संबोधित केलं होतं. दादा वासवानी यांचा जन्म 2 ऑगस्ट 1918 साली झाला होता. एम.एस्सी फिजिक्स असलेल्या दादांचा एक्सरे बाबतचा प्रबंध नोबेल पुरस्कार विजेते सी.व्ही.रमण यांनी तपासला होता. वासवानी यांनी अहिंसा, प्रेम आणि धर्म या विषयांवर लंडनच्या संसदेत, ऑक्सफर्डच्या जागतिक धर्मगुरू परिषदेत, शिकागोत आयोजित करण्यात आलेल्या धर्मसंसदेत तसेच अमेरिकेत आयोजित करण्यात आलेल्या जागतिक शांतता परिषदेतही त्यांचे विचार मांडले होते. ज्याचं त्या त्या देशातील नागरिकांनी प्रचंड कौतुक केलं होतं.
Post Comment