Breaking News

अर्बन बँकेतील गांधीगीरीचे गौडबंगाल ः भाग 16 अर्बन बँकेचा निव्वळ नफा, ठेवी, एनपीएचा आकडा, साराच लफडा

अहमदनगर/ विशेष प्रतिनिधी : एनपीएमुळे बँकेला बसणारा आर्थिक फटका चार भिंतीच्या बाहेर गेला तर ठेवीदारांच्या मानसिकतेवर परिणाम होईल, ठेवी काढून घेतल्या जातील, नवीन ठेवीदार पाठ फिरवतील, रिझर्व्ह बँकेच्या कारवाईला सामोरे जावे लागेल या भितीपोटी नगर अर्बन बँकेच्या विद्यमान संचालक मंडळाने पडलेले खड्डे भरण्यासाठी नवीन खड्ड्यांची निर्मिती केली आहे. संचालक मंडळाने दाखवलेला नफा, एनपीए रेशो ही सर्व आकडेवारी खोटी, फसवी आणि शुध्द फसवणूक करणारी असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत.
...................................................................................................................................................
सन 2016-17 या आर्थिक वर्षात अर्बन बँकेला निव्वळ नफा किती झाला, किती ठेवी आहेत, किती कर्ज खाते चोख आहेत, खरा एनपीए किती असा नवा मुद्दा चर्चेत आला आहे. बँकेच्या संचालक मंडळाकडून या सर्व मुद्यांशी संबंधित आकडेवारी खोटी फसवी आणि अ‍ॅडजेस्टमेंट सिध्द करणारी असल्याचा दावा जाणकार करीत आहेत. बँकेचा निव्वळ नफा फुगवून दाखवण्यासाठी कर्मचार्‍यांच्या पगारी रजा रक्कम तरतुदीचा तब्बल 14 कोटी रूपये नफा दाखविण्यात आला आहे. थकबाकी व्याज जमा खर्चाची रक्कम कमी दाखविली व जो खरा नफा 8 कोटी 28 लाख होता तो फुगवून 10 कोटी 44 लाख दाखविला. या गंभीर कारस्थानाबद्दल रिझर्व्ह बँकेने लाभांश वाटपाची परवानगी अडवून ठेवली होती व बँकेच्या सभासदांना सप्टेंबर/ऑक्टोंबर मध्ये लाभांश मिळणे अपेक्षित असताना तो थेट 26 जानेवारी 2018 ला मिळाला. 
बँकेचा एनपीए प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे व हा खरा आकडा सभासद, ठेवीदार, सहकार खाते व रिझर्व्ह बँके समोर आला तर कारवाईला सामोरे जावे लागेल व ठेवीदार सभासदांच्या मनोधर्यावर परिणाम होईल म्हणून कारस्थान करून अनेक नवीन कर्जखाती फक्त आणि फक्त एनपीए कमी करण्यासाठी तयार करण्यात आली. म्हणजे थोडक्यात आजचे मरण उद्यावर किंवा छोटा खड्डा भरणे साठी मोठा खड्डा खोदण्याचा हा प्रकार मानला जातो. 2016 मध्ये केंद्र सरकारने केलेल्या नोटाबंदीच्या काळात बंद झालेल्या 1000 व 500 चे नोटा खातेदारांनी बँकेत नाईलाजास्तव आणून भरल्या व ही रक्कम 200 कोटींची असल्याची कबूली खुद्द दिलीप गांधी यांनीच दिलेली आहे. ही 200 कोटीची नशिबाने मिळालेली अनैसर्गिक वाढ सोडली तर बँक मल्टीस्टेट झाल्यानंतर ठेवी मध्ये वाढ तर सोडा घट झालेली आहे व ही बाब लपविण्यासाठी ठेवीचा आकडा विविध क्लृप्त्या वापरून वाढवून दाखविला जातो ही वस्तूस्थिती आता सभासदांपासून लपलेली नाही.(क्रमशः)




जाणकार सभासदाची प्रतिक्रिया
कर्ज नियम, एन पी ए चे नॉर्मस् सगळे गुंडाळून ठेवून ठेवीदारांच्या पैशाचा खेळखंडोबा.... 
यांनी स्वत: कधीच कुठल्याच आर्थिक संस्थेचे कर्ज वेळेवर किंवा सरळमार्गाने फेडले नाही त्यामुळे असे करणे त्यांना डावे हाताचा मळ वाटतो.... 
नगरचा कर्जदार जालना वालेची थकबाकी भरतो, 
शिर्डी, राहत्यावाला पाथर्डीचे थकबाकी भरतो 
वेंकटेश अनेकांना पावतो, 
एखंडेचे श्रीखंड कोणी ही खाते, 
कवडे, सिनारे ना विश्‍वास मिळतो. 
घृष्णेश्‍वर, जिजाई चे कृपेने अनेक पावन होतात
साई चे हेलीकॉप्टर कोटी ची उड्डाणे घेतात. 
नवीन टेक्नोलॉजी टेरा टेरा करते 
पिंप्रीचे चव्हाणांची नेश कॉफी नगरवालेंना तरतरी आणते 
पैसे ठेवीदारांचे मग माझे काय जाते. 
काही झाले तरी मिळणार मला वाढीव भत्ते... 
100 कोटींचा एकून जुमला लेखापरिक्षकांना लाखोंचा मोबदला..
धन्यवाद दैनिक लोकमंथन आपण नेमक्या विषयावर प्रकाश टाकला आहे... 100% सहमत
-एक जाणकार सभासद,
अहमदनगर