शेअरबाजाराची विक्रमी घौडदौड सेन्सेक्स 36,699.53 तर निफ्टीने गाठला 11 हजारांचा पल्ला

मुंबई : मुंबई शेअर बजाराच्या सेन्सेक्सने गुरूवारी नवा उंच्चाक प्रस्थापित केला. दिवसभराच्या उलाढालीदरम्यान सेन्सेक्सने 36,699.53 ही पातळी गाठली. निफ्टीने 11 हजाराचा महत्वाचा टप्पा पार केला आहे, तर सेन्सेक्सने देखील आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यात 0.05 टक्क्यांपेक्षा जास्त तेजी दिसत होती. मिडकॅप आणि स्मालकॅप शेअरमध्ये देखील उत्साह दिसून आला आहे. बीएसईचा मिडकॅप इंडेक्स 0.7 टक्केवर आला आहे. तर निफ्टीचा मिडकॅप 100 इंडेक्समध्ये 0.6 टक्क्यांची वाढ झाली आहे. भारतीय शेअर बाजाराने 11 हजारांचा टप्पा पार केला, याआधी फेबु्रवारीमध्ये निफ्टीनं हा पल्ला गाठला होता. निफ्टीच्या 50 शेअर्समधील 35 शेअर्सच्या भावात वधारणा झाली होती तर 15 शेअर्सच्या भावांमध्ये घसरण झाली होती. जवळपास 300 अंशांची उसळी आज सेन्सेक्सने मारली असून बाजारामध्ये तेजीचे वातावरण आहे. अर्थात, सेन्सेक्सच्या या रॅलीमध्ये सिंहाचा वाटा रिलायन्स इंडस्ट्रीजचा होता. अकरा वर्षांनंतर पुन्हा रिलायन्सने भांडवली मूल्याच्या बाबतीत 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला. मुंबई शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअरने 1,090 रुपये प्रति समभाग ही विक्रमी उंची गाठली. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये चांगले परिणाम समोर येत असून, विविध कंपन्यांनी चांगली सुरूवात करत विक्रमी नफा कमावला आहे, त्यामुळे शेअर बाजाराची विक्रमी घौडदौड यानंतरही अशीस सुरू राहील अशी गुंतवणूकदारांना आशा आहे. 

कच्च्या तेलाचे भाव कोसळले 
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर कोसळल्याने शेअर बाजारात निर्देशकांने नवा उंच्चाक प्रस्थापित केल्याचे तज्ञांचे मत आहे. बे्रेंट कू्रडमध्ये गेल्या दोन वर्षांतील सर्वात मोठी घसरण झाल्याचा देखील हा परिणाम आहे. तसेच अमेरिका आणि चीनदरम्यान व्यापारयुध्द सुरू झाल्याचे बघायला मिळत आहे. त्याचा परिणाम जागतिक बाजारपेठेवर होण्याची शक्यता होती. मात्र बाजारात भारताची केवळ 2 टक्के भागीदारी असल्यामुळे या व्यापारयुध्दाचा भारतात काहीही परिणाम होण्याची शक्यता नाही, त्यामुळे गुंतवणूकदार निर्धास्त असल्याचा देखील परिणाम शेअर बाजारात पहायला मिळाला. 

रूपया वधारला...
काही दिवसांपूर्वीच डॉलरच्या तुलनेत रूपयांचा भाव घसरला होता. आंतरराष्ट्रीय घडामोडी लक्षात घेता रूपया पुन्हा सावरतांना दिसून येत आहे. आजमितीस रूपयाचा भाव 19 पैशाने वाढून 68.58 रूपयांवर पोहचला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला असून, बाजरात नवचैतन्य निर्माण संचारल्याचे सांगण्यात येत आहे.