Breaking News

नारायणगिरींचे कार्य भक्तांच्या उध्दारासाठी : ह. भ. प. मंडलिक


नेवासाफाटा प्रतिनिधी - आपल्या वैदिक संस्कृतीत संत सज्जनांनी मानवी समाजाला अध्यात्मिक दिशा दाखविण्याचे कार्य नेहमीच केले. माऊलींच्या या तालुक्यातही विविध संतांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्मिक कार्य सुरु आहे. यात सद्गुरु नारायणगिरी महाराजांचे सुरु असलेले अध्यत्मिक कार्य भक्तांच्या उद्धारासाठी आहे, असे प्रतिपादन ह. भ. प. उद्धव महाराज मंडलिक यांनी केले.

नेवासा बुद्रुक शिवारातील सुरेगाव रस्त्यावर असलेल्या सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठान प्रांगणात गुरुवार दि.१२ एप्रिल पासून सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या पंचदिना त्मक पुण्यतिथी सोहळ्यास धर्मध्वजारोहन करून प्रारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. या महोत्सवाचा शुभारंभ माजी आ. शंकरराव गडाख आणि हभप उद्धव महाराज मंडलिक यांच्या हस्ते धर्मध्वजपूजनाने करण्यात आला. माजीमंत्री अण्णासाहेब म्हस्के, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचे पौरोहित्य भेंडा येथील वेदशास्त्रसंपन्न पुरोहित गणेशदेवा कुलकर्णी यांनी केले. पंचदिनात्मक कार्यक्रमाचे संयोजक ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक नेवासेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. सद्गुरू नारायणगिरी महाराज प्रबोधन प्रतिष्ठानच्या माध्यमातून अध्यामिक कार्याबरोबर ज्ञानदानाचे कार्य वाढीस लावायचा प्रयत्न पसायदान विद्या मंदिर या शाळेच्या माध्यमातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना माजी आ. शंकरराव गडाख म्हणाले, तीन ते चार महिन्यापूर्वी मी येथे भूमिपूजनाकरीता आलो, तेव्हा येथे उजाड माळरान होते. उध्दव महाराजांनी येथील अध्यत्मिक कार्याबरोबर संस्कार देणारी शाळा सुरू करून वृक्षारोपणाद्वारे या भागाचे नंदनवन केले आहे. येथून संस्कार घडविणारी पिढी निर्माण होईल, अशा शुभेच्छा देऊन उद्धव महाराजांच्या या कार्याला कधीही सांगा पाठबळ देऊ अशी, ग्वाही दिली.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के म्हणाले, माजी केंद्रीय मंत्री स्व. बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रेरणेने येथे हभप उद्धव महाराजांनी त्यांचे श्रद्धास्थान असलेल्या सद्गुरू नारायणगिरी महाराजांच्या नावे प्रतिष्ठान सुरू केले. भक्तिमार्गाला ज्ञानमार्गाची जोड त्यांनी दिली असून या प्रतिष्ठानचे भवितव्य उज्वल आहे. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मुळा साखर कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर, लोणी येथील किसनराव विखे, कचरू निर्मळ, देवळाली प्रवराचे नगरसेवक सचिन ढूस, हभप रामनाथ महाराज पवार, हभप ज्ञानेश्वर माऊली शिंदे, अँड. बाळासाहेब शिंदे, नेवासा बुद्रुकचे सरपंच दादासाहेब कोकणे, डॉ. मुरलीधर कराळे, प्रा. रामनाथ नन्नवरे, भारत महाराज धावणे, नामदेव थोरात, हभप साधना मुळे, दशरथ मुंगसे आदींसह भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. 

माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांच्या संकल्पनेनुसार येथे सद्गुरू नारायणगिरी महाराजांचे दगडी शिल्प असलेल्या मंदिराचे काम प्रगतीपथावर असून ते काम लवकरच भक्तांच्या पाठबळाने पूर्णत्वाकडे जाईल असा विश्वास हभप उद्धव महाराज यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. नगरसेवक इंजिनियर सुनील वाघ यांनी आभार मानले.