भाजपाची नितिमत्ता घसरली ; प्रचारासाठी पाठ्यपुस्तकाचा वापर आ. डॉ. सुधीर तांबे यांचा आरोप
ते म्हणाले, राज्यातील राजकीय घडामोडींचे पडसाद आता शालेय अभ्यासक्रमात उमटू लागले की काय, असा प्रश्न निर्माण करणारे उल्लेख यंदाच्या पाठ्यपुस्तकात दिसून येत आहेत. दहावीत यंदा प्रथमच राज्यशास्त्र या विषयाचा समावेश करण्यात आला आहे. यातील एका धड्यात भाजपा आणि शिवसेनेचे कौतूक करणारी माहिती देण्यात आली आहे. भाजपा हा राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा पक्ष आहे. प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा यांचे जतन केले पाहिजे, अशी पक्षाची भूमिका आहे. आर्थिक सुधारणांवर या पक्षाचा भर आहे, असा उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. तर शिवसेनेचीही पाठ्यपुस्तकात स्तुती करण्यात आली आहे. शिवसेना हा राज्यातील प्रमुख पक्ष असून त्याची स्थापना मराठी माणसांच्या हक्कांच्या जपणूक, मराठी भाषेचे संवर्धन व परप्रांतियांना विरोध करण्यासाठी झाली आहे, असा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे शिवसेनेबाबत माहिती देताना भगव्या रंगाचा वापर करण्यात आला. घराणेशाही ही लोकशाहीसमोरील मोठी समस्या आहे का, असा प्रश्न पुस्तकात विचारण्यात आल्याचे बोलले जात आहे. याद्वारे काँग्रेसला चिमटा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला की काय, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. पाठ्यपुस्तकात विविध राजकीय पक्षांचा परिचय करून देत असताना सत्तेमध्ये असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेने आपला पक्ष इतरांपेक्षा वेगळा असून इतर पक्ष चुकीचे आहेत, असे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. हे चुकीचे असून भारतीय जनता पार्टीची नीतिमत्ता एवढी घसरली, की ते आता स्वतः च्या पक्षाचा प्रचार करण्यासाठी पाठ्यपुस्तकाचा वापर करत आहे. शासनाचे धोरण कोठेतरी इतिहास, अभ्यासक्रम बदलायचे असून त्यांची बुरसटलेली विचारसरणी लोकांच्या मनावर थापण्याचा प्रयत्न चालू आहे. शिक्षण अत्यंत महत्त्वाची व्यवस्था असून शिक्षण व्यवस्थेला अशा पद्धतीने कोणीतरी राजकीय हेतू मनामध्ये ठेऊन त्याचा वापर करणे, हे अत्यंत गंभीर आहे. देशाच्या राज्य घटनेविरुद्ध आहे.