महसूलमंत्र्यांना उस्मानाबादमध्ये अडविण्याचे राष्ट्रवादीचे प्रयत्न अयशस्वी

उस्मानाबाद, दि. 24, नोव्हेंबर - कर्जमाफी, वीज तोडणी, भारनियमन, ऊसदराच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसने मंत्र्यांना जिल्ह्यात फिरु न देण्याचा इशारा यापूर्वीच दिला आहे. त्यानुसार आज महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना अडविण्याचे आटोकाट प्रयत्न केले़ मात्र ते यशस्वी झाले नाहीत. 


अखेर काळे झेंडे दाखवून सरकारविरोधी घोषणा देवून समाधान मानावे लागले. चंद्रकांत पाटील यांनी मात्र या आंदोलनाची संवेदनशीलतेने दखल घेत राणा जगजीतसिंग पाटील यांच्याशी चर्चा केली व मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन क रण्याचे आश्‍वासन दिले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या या आंदोलनाची धार आपोआप कमी झाली.
आज सकाळी महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री बांधकाम विभागाच्या अधिका-यांच्या आढावा बैठकीसाठी उस्मानाबाद दौ-यावर असल्याचे समजताच त्यांना जिल्ह्याच्या सीमेवरच अडविण्याचे नियोजन राष्ट्रवादीने केले़ होते. त्यानुसार लातूरहून येणा-या सर्व रस्त्यांवर कार्यकर्ते उतरविले़ मात्र, चंद्रकांत पाटील यांना प्रशासनाने नियोजित वेळेआधीच तुळजापूर मार्गे उस्मानाबादेत दाखल केले़. 

यावेळी पाटोदा चौरस्त्यावर राष्ट्रवादीच्या आंदोलकांनी त्यांना काळे झेंडे दाखवून सरकारविरोधी घोषणा दिल्या़ शासकीय विश्रामगृहावर बैठकीसाठी मंत्री पोहोचल्यानंतर तेथेही कार्यकर्त्यांनी मध्ये शिरण्याचा प्रयत्न केला़ मात्र पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेरच त्यांना रोखून धरले. 

या विषयात चंद्रकांत पाटील व राणा जगजितसिंह पाटील यांच्यात चर्चा होवून त्यांच्या मागण्यांसदर्भात उद्या मुख्यमंत्र्यांकडे बसून चर्चा करण्याचे निश्‍चित झाल्यानंतर आंदोलनाची धार सौम्य झाली़ स्वत: राणा जगजितसिंह यांनी कार्यकर्त्यांना त्यांच्यातील चर्चेचा तपशील सांगितल्यानंतर आंदोलन निवळले़ बैठक संपल्यानंतर महसूलमंत्री व राणा जगजितसिंह एकाच वाहनाने सोलापूरकडे रवाना झाले.