Breaking News

...तर इतिहास माफ करणार नाही

दोन मुलांना नग्न करुन अमानुष मारहाण केल्याप्रकरणी काँगे्रसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे वक्तव्य 
नवी दिल्ली - विहिरीत आंघोळ केली म्हणून दलित मुलांची नग्न धिंड काढल्याची घटना जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे घडली. याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या व्देषाच्या राजकारणामुळे दलितांवरील अत्याचार वाढ होत असल्याचा आरोप राहुल यांनी केला.

महाराष्ट्रातील दलित मुलांचा दोष एवढाच होता की त्यांनी ‘सवर्णां’च्या विहिरीत अंघोळ केली. आज माणुसकी अखेरच्या घटका मोजत आहे. एका काडीच्या आधारावर अस्मिता वाचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या व्देषाच्या राजकारणाविरोधात आपण आवाज उठविला नाही, तर इतिहास आपल्याला माफ करणार नाही.
विहिरीत पोहल्याने बारा ते पंधरा वर्षे वयोगटाच्या दलित समाजाच्या दोघांची नग्न धिंड काढण्यात आल्याचा प्रकार घडला. या मुलांना कमरेचा पट्टा तसेच काठीने अमानुष मारहाणही करण्यात आली आहे. जामनेर तालुक्यातील वाकडी गावात ही घटना घडली.
या मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या प्रकरणी आरोपी सोनू लोहारसह त्याच्या साथीदाराला अटक केल्याची माहिती सामाजिक न्याय राज्य मंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे. आरोपींवर मारहाण करणे आणि सोशल मीडियावर फोटो व्हायरल करणे यासाठी आयटी अ‍ॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अ‍ॅट्रोसिटीचाही गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.