Breaking News

शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने भव्य दुचाकी रॅली

सातारा, दि. 01, ऑगस्ट - खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यावर दाखल केलेले गुन्हे खोटे असून ते मागे घ्यावेत, या मागणीसाठी सातारा शहरात  शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. संभाजीराव भिडे गुरूजींच्या सहभागाने रॅलीचे लक्ष वेधून घेतले.
रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचे 32 मण सुवर्णसिंहासन निर्माण संदर्भात न्यू इंग्लिश स्कूल सातारा येथे संभाजीराव भिडे गुरूजींचे व्याख्यान झाल्यानंतर  दुचाकी रॅलीला सुरूवात झाली. रॅलीच्या समोर भव्य भगवा झेंडा घेवून धारकरी सहभागी झाले होते. त्यांच्या मागे शिस्तबद्धपणे पांढर्या टोप्या परिधान करून धारकरी  सहभागी झाले होते. यावेळी जय भवानी जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम, हर हर महादेव, हिंदू धर्म की जय, एक राजा एक आवाज  उदयन महाराज, उदयन महाराज अशा घोषणांनी रॅली मार्ग परिसर दणाणून गेला. रॅली न्यू इंग्लिश स्कूल, राजपथ, मोती चौक, सम्राट चौक, मल्हारपेठ, पोलिस  मुख्यालय, गिते बिल्डींग मार्गे पोवईनाक्यावर आली. त्यांनतर पोवईनाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा संघटक सतीश  ओतारी व अन्य धारकर्यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर पुन्हा रॅली पोवईनाका, रयत शिक्षण संस्था, नगरपालिका, कमानी हौद,  राजवाडा, मार्गे जलमंदिर येथे गेली. रॅली मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून रॅलीचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.
जलमंदिर येथील भवानीमाता मंदिरासमोर धारकर्यांनी प्रेरणामंत्र म्हटला. त्यानंंतर भवानी मातेचे संभाजीराव भिडे गुरूजीं यांनी दर्शन घेतल्यानंतर रॅलीची सांगता  झाली. रॅलीत हणमंत खोले, ओकांर डोंगरे, अजिंक्य गुजर, संदीप जायगुडे, शूभम शिंदे, ऋषीकेश इंगवले, राहुल इंगवले व जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील धारकरी,  शिवप्रेमी, गणेश उत्सव मंडळे, दुर्गादेवी उत्सव मंडळे व नागरिकांनी सहभाग घेतला.