Breaking News

भाजपच्या घोषणांचे पितळ उघडे : पृथ्वीराज चव्हाण

सातारा : केवळ मोठमोठ्या घोषणा करायच्या. त्याकामी कोणतीही तरतूद करायची नाही. केवळ लोकांना भुलवण्यासाठी पुकारलेल्या घोषणा व योजनांची फसवेगिरी करणारे केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार आहे. त्यांचे विकासाचे सोंग जनतेने ओळखले आहे, असे सांगून कोट्यवधींची कर्जे बुडवणार्या उद्योगपतींना हीच मंडळी पाठिशी घालत आहेत. परंतु शेतमालाला अपेक्षीत दर देण्यात मात्र हेच सरकार अपयशी ठरले आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.
आ. चव्हाण म्हणाले, वहागावने मला नेहमीच भरभरून पाठिंबा दिला आहे. तुम्ही माझ्या राजकीय कारकिर्दीला मोठी मदत करून पाठबळ दिले. त्यातून उतराई होण्यासाठी मुख्यमंत्री असताना खूप मोठ्या प्रमाणात प्रत्येक गावामध्ये निधी देता आला. पंतप्रधान कार्यालयाचा मंत्री असताना राज्यातील विकासासाठी भरीव पाठबळ दिले. व नवनवे प्रकल्प आणले. मुख्यमंत्री असताना मला खूप समाधान आहे की, महाराष्ट्रात मी मूलभूत कामे करू शकलो. 108 टोल फ्री रुग्णवाहिका, बालस्वास्थ्य योजना, राजीव गांधी जीवनदायिनी योजना, साखळी सिमेंट बंधारे या महत्वपूर्ण लोकहिताच्या योजना आणल्या. पण भाजपने केवळ या योजनांची नांवे बदलण्याशिवाय दुसरे काहीच केले नाही. 
यावेळी चव्हाण म्हणाले की, राज्यातील सरकार गेल्या 4 वर्षात महसूल वाढवू शकलेले नाही. त्यामुळे राज्यावरील कर्ज वाढले आहे, त्यासाठी सरकारने पेट्रोल व डिझेलच्या किंमती वाढवल्या. इंधनावरील कर वाढवल्याने दर वाढले आहेत. कर वाढवल्याशिवाय सरकार चालवणे कठीण बनले आहे. केवळ घोषणाबाजी करणार्या सरकारकडून शेतमालाला हमीभाव मिळत नाही, उत्पन्नवाढीची घोषणा पाळलेली नाही. मेक इन इंडियाची घोषणाही फसवी निघाली आहे. यामध्ये 8 लाख कोटींची गुंतवणूक व 30 लाख नोकर्या देणार, अशी सरकारची घोषणा होती. सातारा, सांगली व क ोल्हापूर जिल्ह्यात मेक इन इंडियातून कुठे गुंतवणूक झाली. मी याबाबत सातत्याने विधानसभेत विचारणा करतोय, पण हेच सरकार पारदर्शकपणे रोजगारवाढीसाठी काय केले ते सांगायला तयार नाही. आ. चव्हाण शेवटी म्हणाले, भाजपने आव आणला होता की, आम्ही भ्रष्टाचार करणार नाही. पण हे खूप मोठे भ्रष्टाचारी सरकार आहे. बेधडक खोटे बोलणार्या सरकारचे विकासाचे सोंग लोकांच्या लक्षात आले आहे. यावेळी आ. आनंदराव पाटील म्हणाले की, पृथ्वीराजबाबांनी कराड दक्षिणमध्ये प्रत्येक गावात विकासनिधी दिला आहे. आजही त्यांचे मतदारसंघावर तितकेच सूक्ष्म लक्ष आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांची मापे काढू नयेत. गल्लीतील राजकारण करणारे कोल्हापूरचे नेते उगीचच बाबांच्या भवितव्याची काळजी करतात. असा टोलाही त्यांनी लगावला.