Breaking News

जिजाऊच्या जन्मभुमीचा कलंक पुसतील आता ‘आशा’- प्रा.सुनिल देशमुख

बुलडाणा, दि. 01 - राष्ट्रमाता जिजाऊंची जन्मभुमी असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात स्त्री जन्म दराचे प्रमाण अतिशय घसरल्याने ही भुमि आता कलंकीत ठरत आहे. मात्र हा कलंक पुसण्याची क्षमता गावपातळीवर राष्ट्रीय आरोग्य अभियानात काम करणारी ‘आशा’ कार्यकर्त्यांमध्येच असल्याचे प्रतिपादन प्रा.सुनिल देशमुख यांनी केले. 28 जून रोजी मोताळा येथे कार्यशाळा आयोजित केली होती यावेळी ते बोलत होते.  

बुलडाणा जिल्ह्यात 1000 पुरुषांचे मागे केवळ 853 स्त्री जन्मदर ही अतिशय चिंतेची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. ‘लेक माझी’ कुटुंबातील सदस्यांनीहा घटलेला स्त्री जन्म दर वर येण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली त्याचाच परिणाम म्हणून 2014-15 मध्ये स्त्री जन्मदर वाढला परंतु पुन्हा हे अभियान थंडावले. मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजु झालेल्या आणि संवेदनशील असलेल्या दीपा मुधोळ यांनी अभियानात प्राण फुंकल्याचे प्रा.देशमुख यांनी सांगितले. सदर कार्यशाळेला मोताळा व नांदुरा तालुक्यातील सर्व आशा व आरोग्य सेविका यांची उपस्थिती होती. सदर एक दिवसीय प्रशिक्षणामध्ये डॉ.माधवी जवरे यांनी स्त्रीयांना स्वत:ची जाणीव घेण्यासाठी सांगितले.
स्वच्छ भारत मिशनचे निवृत्ती शेडगे यांनी आपल्या सहज विनोदी शैलीने सर्व आशांशी संवाद साधून ग्रामस्तरावर आशांनी समाजातील ‘स्त्रीश्र्ुण हत्या’ थांबविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपा मुधोळ यांचे प्रतिनिधी म्हणून कोणत्याही दबावाला बळी न पडता ही चळवळ यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करावे असे अवाहन केले. सदर कार्यशाळेस तहसीलदार खंडारे तसेच वैद्यकिय क्षेत्रात काम करणा-या ‘निमा’ संघटनेचे पदाधिकारी हजर होते. कार्यशाळेत ग्रामीण भागात उल्लेखनीय काम करणा-या आशांमध्ये सौ.कविता चव्हाण ज्यांनी आपल्या धाडसाने 6 बालीकांचे प्राण वाचविलेत त्यांच्यासह सौ.शारदा लिंगाईत, लता राऊत, अनिता इंगळे, प्रमीला उगले, रुपाली पायघन, रमाबाई निंबाळकर यांचा प्रा.देशमुख व डॉ.सौ.जवरे यांच्या हस्ते पुरस्कार तसेच सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक डॉ.वनिता रिंढे, तालुका आरोग्य अधिकारी नांदुरा डॉ.ए.एम.सायर व विजय शेपळे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी पं.स.मोताळा व नांदुरा येथील सर्व आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले तर आभारप्रदर्शन आरोग्य सेविका स्वाती शेंद्रे यांनी केले असे निवृत्ती शेडगे यांनी कळविले आहे.