प्राचार्यांच्या मनमानी कारभारा विरोधात शेकडो विद्यार्थी रस्त्यावर

हिंगोली, दि. 31 - महाविद्यालयाच्या महिला प्राचार्यांच्या मनमानी कारभार आणि अवास्तव फी वसुलीसाठी दिल्या जाणार्‍या अपमानास्पद वागणुकीला कंटाळून शेकडो विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. तब्बल दोन तास नांदेड औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
वसमत तालुक्यातील अन्नपूर्णादेवी कनिष्ठ महाविद्यालयात संस्थेचे अध्यक्ष मोहन मोरे यांच्या पत्नीच प्राचार्य आणि सचिव पदावर कार्यरत आहेत. प्राचार्य मॅडमकडून विद्यार्थी आणि शिक्षकांचा छळ होत असल्याच्या तक्रारी कायम येत असतात. विद्यार्थ्यांना मनमानी फी आकारणी होत असल्यावरूनही हे महाविद्यालय चर्चेत असते. प्राचार्यांनी महाविद्यालयात पाय ठेवताच ज्या विद्यार्थ्यांकडे फी शिल्लक आहे. त्यांना वर्गात बसता येणार नसल्याचे फर्मान सोडल्याने विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध सुटला. दुष्काळी आणि आत्महत्यागˆस्त शेतकर्‍यांच्या गावातीलच बहुतेक विद्यार्थी या महाविद्यालयात आहेत. प्राचार्यांच्या मनमानीचा निषेध नोंदवत विद्यार्थी विद्यार्थिनींननी थेट महामार्गावर धाव घेतली. रास्तारोको आंदोलन सुरू केले. मनमानी फी वसुली बंद करा, प्राचार्यांची हकालपट्टी करा, अशा घोषणा विद्यार्थी देत होते. तब्बल दोन तास राष्ट्रीय महामार्गावर रहदारी ठप्प झाली होती. दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. विद्यार्थ्यांशी संवाद साधला असता, विद्यार्थ्यांनी अव्वाच्या सव्वा फी आकारली जाते. प्रॅक्टीकलसाठीही पैसे मोजावे लागतात. जे पैसे देणार नाहीत त्यांना प्रॅक्टीकलचे मार्कच कमी दिले जातात. बोनाफाईड देण्यासाठीही पैसे द्यावे लागतात. महाविद्यालयातील अतिरिक्त ठरलेल्या तीन शिक्षकांचे वेतन करण्यासाठीही विद्यार्थ्यांकडूनच पैसे उकळले जातात. फी कमी दिली म्हणून अकरावीच्या अनेक विद्यार्थ्यांच्या शेवटचे दोन पेपरला प्राचार्यांनी बसू दिले नाही, असे गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केले आहे.