जामखेड तालुक्याचा वाढता शैक्षणिक आलेख
शैक्षणिक वार्तापत्र - यासीन शेख जामखेड
प्रचंड इच्छाशक्तीने, नागरिकांमध्ये मिळून मिसळून काम केल्यामुळे 2 कोटी 7 लाख 13 हजार रुपये लोकवर्गणी गोळा करून, भौतिक सुविधा उपलब्ध करून 84 जिल्हा परिषदेच्या शाळा आयएसओ केल्या. शैक्षणिकदृष्ट्या मागास तालुक्याची ओळख पुसून महाराष्ट्रातील आयएसओ तालुका म्हणून ओळख निर्माण केली. यासाठी माजी सभापती डॉ. भगवान मुरुमकर व गटशिक्षणाधिकारी पोपट काळे यांनी प्रयत्न करून तालुक्यात एक शैक्षणिक क्रांती केली.
नगर जिल्ह्यातील सर्वात लहान व मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून जामखेड तालुका ओळखला जातो. तसेच शैक्षणिक दृष्ट्याही मागास म्हणून ओळखला जात होता. 2012 मध्ये पंचायत समितीच्या सभापतीपदी डॉ. भगवान मुरुमकर विराजमान झाले. 2015 मध्ये गटशिक्षणाधिकारी म्हणून पोपट काळे उपस्थित झाले. तालुक्याची शैक्षणिकदृष्ट्या मागास ही ओळख पुसण्यासाठी मुरुमकर आणि काळे झपाटून कामाला लागले. पक्षभेद व मतभेद विसरून गावोगावी जाऊन लोकांचे मेळावे घेऊन, शाळेसाठी आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी लोकवर्गणीचे आवाहन केले. यास भरभरून प्रतिसाद मिळत गेला. 2 कोटी 7 लाख 13 हजार रुपये लोकवर्गणी गोळा झाली. यातून संरक्षण भिंत, बसण्यासाठी बाकडे, शाळेची रंग लंगोटी, बोलक्या भिंती, डिजिटल शाळा, पंखे, ज्ञानरचनावादी साहित्य निर्मिती केली, शाळा परिसर स्वच्छ केला, परिसरात वृक्षारोपण केले, यामुळे 84 शाळा आयएसओ शाळा झाल्या. यामुळे जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थी संख्या वाढली. इंग्रजी माध्यमाच्या शाळा ओस पडल्या. वाढीव पटामुळे शिक्षक संख्या वाढली. त्यामुळे जिल्ह्यात सर्वात लहान तालुका महाराष्ट्रात शैक्षणिक दृष्टीने सर्वात प्रगत व आयएसओ शाळांचा तालुका झळकत आहे. याचे सर्व श्रेय मुरुमकर व काळे यांनाच जाते.
जिल्हा परिषदेची शाळा म्हणाले की, नाक मुरडणारा पालक आज प्राधान्याने जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेत आहे. 180 शाळांपैकी 80 शाळा आयएसओ झाल्या आहेत. उर्वरित शाळाही लवकरात लवकर आयएसओ करणार आहेत, असे गटशिक्षणाधिकारी पोपट काळे यांनी सांगितले. अनेक पालकांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकणारा आपला मुलगा जिल्हा परिषद शाळेत प्रवेश घेतला आहे.
पाच वर्षे पंचायत समितीच्या माध्यमातून व पालकमंत्री राम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध रस्ते, बंधारे, सभामंडप तसेच जलयुक्त शिवारच्या प्रभावी कामामुळे, भूगर्भात पाणी साठ्यात वाढ झाली. तालुका टँकर मुक्त झाला आहे. तसेच फक्त शाळाच आयएसओ करून थांबले नाहीत तर, पंचायत समितीचे नवीन कार्यालय चकाचक करून विभागवार कामाचा ताबडतोब निपटारा केला. सर्व विभाग संगणकीकृत केले यामुळे, महाराष्ट्रातील पहिली पंचायत समिती आयएसओ झाली.
तालुक्यातील 84 शाळा आयएसओ झाल्यामुळे आयएसओचा तालुका म्हणून राज्यात ओळख निर्माण झाली. यामुळे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनीही ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धेच्या युगात मागे राहू नये, त्याला जगाचे ज्ञान व्हावे म्हणून पहिल्या टप्प्यात 84 आयएसओ शाळांपैकी 50 शाळांना एल.ई.डी व एलसीडी प्रोजेक्टर दिले आहेत. यामुळे मोठ्या पडद्यावर पाठ्यपुस्तकातील अभ्यास करणे सोपे होणार आहे.
दैनिक लोकमंथनशी बोलताना डॉ. मुरुमकर म्हणाले की, मी सभापती पदाच्या पाच वर्षांच्या काळात पक्षभेद व गटतट विसरून काम केले. सर्वसामान्य जनतेसाठी शासकीय शाळा जिवंत राहणे गरजेचे आहे. या कामात गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, सर्व शिक्षक, उपसभापती, पंचायत समिती सदस्य व सर्वच ग्रामस्थांनी सहकार्य केले. यामुळेच ही शैक्षणिक क्रांती आपण करू शकलो. मागासलेला तालुका ही ओळख पुसून आयएसओ तालुका म्हणून व एक शैक्षणिक पर्यटन तालुका म्हणून नावारूपाला आणला आहे.