Breaking News

युवकांचे विचार बदलण्याची गरज : डॉ. कुमार सप्तर्षी


कुळधरण / प्रतिनिधी 
विकासाचे परीवर्तन घडवायचे असल्यास, देशातील भावी नेतृत्व असणार्‍या युवकांचे विचार बदलावे लागतील असे प्रतिपादन माजी आ. डॉ. कुमार सप्तर्षी यांनी केले. राशीन येथे युवक क्रांती दलाच्यावतीने जगदंबा सांस्कृतिक भवनात आयोजित युवा परीसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते.
अहमदनगर येथील सा. कार्यकर्ते युनुस तांबटकर, युक्रांदचे कार्यवाह आप्पा अनारसे, राज्य संघटक मनोहर जांबुवंत, किरण पोटफोडे, प्रकाश बजाज, शिवाजी सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम झाला.
डॉ. सप्तर्षी पुढे म्हणाले, सध्या तरूणांचे सामाजिक शोषण होत आहे. तरूणांचा राजकारणामध्ये होत असलेला वापर लोकशाहीच्या दृष्टीने बाधक आहे. तरूणांच्या डोक्यात जातीयतेचे विचार रुजविले जात असुन, त्यातुन समाजात तेढ निर्माण केली जात आहे. लहानपणापासुनच लोकशाहीची तत्वे मनावर बिंबवा म्हणजे मनात जातीय तेढ निर्माण होणार नाही. जगात भारतीय संस्कृतीचे व संविधानाचे अनुकरण केले जाते. मात्र आपल्या देशात जातीय सलोखा बिघडवण्यासाठी युवकांचा वापर केला जात आहे. मुक्या प्राणीमात्रात स्वधर्माचे पालन होते. माणुस तर चांगल्या विचारांचे व्यासपीठ आहे. आपापसातील संवाद वाढवून विचारांची देवाणघेवाण झाल्यास द्वेष निर्माण होणार नसल्याचे सांगत, प्रत्येकातील प्रत्येकाविषयी आदर, नम्रता असणे हे हत्यार आहे, असे विचार डॉ. सप्तर्षी यांनी मांडले.
सोशल मिडीयावरील अफवांचे पिक हे दंगली करण्यास कारणीभुत असुन, तरूणांना चांगले मार्गदर्शन करणे काळाची गरज असल्याचे युनुस तांबटकर यांनी सांगितले. आजच्या तरूणांनी संविधानाचे रक्षण केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आप्पा अनारसे यांनी केले. आभार किरण पोटफोडे यांनी मानले. महंमद फकिर, नवनाथ जांभळकर, रामभाऊ साळवे, भिमराव साळवे, दत्तात्रय गोसावी, मनोज बोरा ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मोदी सरकार पुन्हा आल्यास संविधानाला धोका
मोदी सरकार परत सत्तेवर आल्यास संविधानाला धोका निर्माण होईल, समाजात खोट्या नाण्यांप्रमाणे खोट्या नेत्यांची फौज असते. सरकारला समाजात भांडण-तंटे निर्माण व्हावे असे वाटते. सत्ताधार्‍यांनी पाठिंबा दिला म्हणुनच तुकाराम महाराज व ज्ञानेश्‍वरांपेक्षा मनु श्रेष्ठ म्हणण्याची भिडेची हिंमत झाली. भिमा कोरेगावसारख्या दंगली घडविण्याणार्‍या मिलिंद एकबोटेची व सर्वसामान्याचा पैसा घेऊन परदेशात पळुन जाणारे विजय मल्ल्या व निरव मोदी हे सरकारचे पाप असल्याचे डॉ. सप्तर्षी म्हणाले.