निमगाव वाघा येथे वृक्षसंवर्धनासाठी पै.नाना डोंगरे यांचा पुढाकार


अहमदनगर - उन्हाची वाढती तीव्रता व झाडांना पाणी नसल्याने नगर तालुक्यातील निमगाव वाघा येथील नवनाथ विद्यालय परिसरात मागील दोन वर्षात लावण्यात आलेली झाडे करपत चालेली असताना डोंगरे बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष पै.नाना डोंगरे यांनी पुढाकार घेवून स्वखर्चाने टँकर आनून झाडांना पाणी दिले. वृक्षरोपणासह वृक्षसंवर्धनाचा ध्यास घेतलेल्या या अवलियाने कोणावर विसंबून न राहता राबविलेल्या उपक्रमाचे पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

मागील दोन वर्षात स्व.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, नवनाथ युवा मंडळ व नवनाथ विद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने शाळेच्या आवारात तब्बल 101 झाडे लावण्यात आली. या वर्षी वाढलेले तापमान व पाणी उपलब्ध नसल्याने ही झाडे दिवसंदिवस वाळत चालली होती. मात्र ही झाडे जगविण्याचा ध्यास घेतलेल्या पै.नाना डोंगरे यांनी तातडीने स्वखर्चाने टँकरची व्यवस्था करुन, झाडांना पाणी दिले. पावसाळ्याच्या आगमना पर्यंन्त त्यांनी ही झाडे जगविण्याची जबाबदारी घेतली असून, वृक्षरोपणा बरोबर प्रत्येकाने डोंगरे यांचा आदर्श घेवून वृक्षसंवर्धन केल्यास निश्‍चित हिरवाई फुलणार आहे. डोंगरे संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणाबरोबर विविध सामाजिक उपक्रम देखील राबविले जातात.

पै.नाना डोंगरे म्हणाले की, शहरीकरणामुळे होणारी वृक्षतोड, औद्योगीकरण व प्रदुषणामुळे पर्यावरणाचा समतोल ढासळत असून, मनुष्याला नैसर्गिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी वृक्षरोपण व संवर्धनाशिवाय पर्याय नाही. झाडे लावण्यापेक्षा ती सांभाळणे ही फार कठिण गोष्ट आहे. ऐन उन्हाळ्यात झाडांना पाणी न मिळाल्यास ती वाळतात व वर्षभर केलेल्या श्रमाला अर्थ उरत नाही. यासाठी झाडांना पाणी देवून ते जगविण्यासाठी कोणाच्या भरोश्यावर न राहता स्वखर्चाने ही झाडे जगविण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे पै.डोंगरे यांनी सांगितले. या उपक्रमासाठी डोंगरे संस्थेच्या सचिव मंदाताई डोंगरे, युवा मंडळाचे अध्यक्ष पै.संदिप डोंगरे, अतुल फलके, किरण जाधव, अजित फलके, संतोष फलके, मयुर काळे, राष्ट्रीय कुस्तीपटू प्रतिभा डोंगरे, शासनाचा आदर्श युवती पुरस्कार प्राप्त प्रियंका डोंगरे आदि परिश्रम घेत आहे.