आर्थिक फसवणुक करणार्‍या जामखेड नगर परिषदच्या वरिष्ठ अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी


अहमदनगर - जामखेड नगर परिषदच्या वरिष्ठ अधिकारी व कर्मचार्‍यांनी संगनमत करुन सुमारे 120 आरोग्य कर्मचार्‍यांचे सह्या व अंगठे घेवून आर्थिक फसवणुक केल्याबद्दल संबंधीतांवर गुन्हा दाखल करुन, कारवाई करण्याची मागणी जामखेडच्या जिव्हाळा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन नायब तहसिलदार महेंद्र पाखरे यांना देण्यात आले. यावेळी सिध्दार्थ घायतडक, मधुकर राळेभात, नामदेव राळेभात, अवधुत पवार, गोरख दळवी, विजय गायकवाड, बाबासाहेब ओहोळ, मिलिंद घायतडक, लक्ष्मण घायतडक, रामदास गायकवाड, राजेंद्र माने, मधुकर निकाळजे, दिलीप डाडर, कल्याण काळे आदिंसह जामखेड नगरपरिषदचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

जामखेड नगर परिषदने आरोग्य कर्मचार्‍यांचे किमान वेतन व महागाई फरकाची चोपन्न हजार सहाशे रुपये रक्कम प्रत्येक कर्मचार्‍यांच्या महाराष्ट्र बँकेच्या जामखेड शाखेत जमा केलेली आहे. दि.20 एप्रिल रोजी जामखेड नगरपरिषदेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने व काही कर्मचार्‍यांच्या संगनमताने सुमारे 120 आरोग्य कर्मचार्‍यांची फसवणुक करुन सही व अंगठे घेतले. सदरील बँक मॅनेजरला हाताशी धरुन या कर्मचार्‍यांच्या बँक खात्यातून सहा हजार तर काही कर्मचार्‍यांच्या खात्यातून पंधरा हजार रुपयाची रक्कम परस्पर काढण्यात आली. याद्वारे आरोग्य कर्मचार्‍यांची फसवणुक करुन तेरा लाख रुपयाचा अपहार करण्यात आलेला आहे. याबाबत सदरील कर्मचार्‍यांनी दि.26 एप्रिल रोजी जामखेड पोलिस स्टेशनला लेखी फिर्याद देखील दिलेली आहे. आरोग्य कर्मचार्‍यांची फसवणुकीची ही घटना गंभीर असून, सुमारे 120 कर्मचार्‍यांची फसवणुक करण्यात आलेली असताना पोलिसांनी संबंधीतांवर पुढील कार्यवाही केलेली नाही.

तरी या घटनेची चौकशी करुन फसवणुक करणार्‍यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. अन्यथा संघटनेच्या माध्यमातून फसवणुक झालेले सर्व शोषित कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.