शासनाच्या ११ विभागातील भरती ही नियमित स्वरुपाचीच - वित्त विभागाचा खुलासा
राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या व कृषि विकासाशी संबंधित असलेल्या विविध विभागातील १०० टक्के रिक्त पदे भरण्याचा निर्णय घेतला असून या सर्व पदांची भरती कायमस्वरूपी पदभरती राहणार असल्याचे वित्त विभागाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणारे आणि कृषि क्षेत्राच्या विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या कृषि, पशुसंवर्धन,ग्रामविकास, आरोग्य, जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम या विभागात तसेच कायदा व सुव्यस्थेसाठी पोलीस दलातील रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. ही सर्व पदे कायमस्वरूपी पदे आहेत.
काही विभागांमध्ये सध्याही पदोन्नती श्रेणीमधील सर्वात खालील पद तसेच जिल्हा स्तरावरील पदे भरताना प्रथमत: ठोक रकमेवर भरुन काही कालावधीनंतर त्यांना नियमित वेतन श्रेणी लागू करण्यात येते, उदा. शिक्षण सेवक. यासाठी प्रशासकीय विभागांनी अशी पदे निश्चित करुन त्यासाठी सेवाप्रवेश नियम निर्धारित करण्याची तरतूद या शासन निर्णयात नमूद केलेली आहे. वर्ग दोनच्या पदांच्या भरतीसाठी हे लागू राहणार नाही असे विभागाने स्पष्ट केले आहे
सदर शासन निर्णयाचा मूळ उद्देश ११ विभागातील पद भरतीसंबंधातील निर्बंध उठवणे आहे. सदर भरती ही कंत्राटी स्वरुपाची नसून नियमित स्वरुपाची आहे. पद भरती करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोग किंवा अन्य प्रचलित पद्धतीनुसार विभागाने नियुक्ती करणे अपेक्षित आहे.
Post Comment