दुध व अन्नातील भेसळ थांबविण्यासाठी जनजागृती मोहिमेची घोषणा
अहमदनगर - दुध व अन्नात होणारी भेसळ तर चुकीच्या पध्दतीने पिकविण्यात येणार्या फळांचे दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. या घातक प्रक्रियेचा नायनाट करण्यासाठी पिपल्स हेल्पलाईनच्या पुढाकाराने कार्यान्वीत करण्यात आलेल्या इंडिया अग्नेस्ट सायलेंट किलर्सच्या वतीने जनजागृती मोहिम राबविण्याची घोषणा करण्यात आली.
दुधामध्ये सर्रास युरिया मिसळला जातो. एका लिटरचे तीन लिटर दूध करण्यासाठी कृत्रीम पध्दतीचा वापर करुन नागरिकांच्या आरोग्याशी खेळले जात आहे. त्याचबरोबर केळी, आंबे कार्बाईडच्या मदतीने त्वरीत पिकवले जातात. अशा पध्दतीने भेसळीद्वारे पैसा कमविला जात आहे. अन्न औषध प्रशासनाचे अधिकारी पगार हमी योजनेवर काम करताना दिसत असून, या प्रकरणाकडे ते डोळेझाक करीत असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
आज भेसळयुक्त अन्नामुळे चाळीस टक्के जनता विविध आजाराने त्रस्त आहे. यामुळे लोक सहभागाशिवाय आणि सरकारच्या भरोशावर ही चळवळ यशस्वी होणार नाही. अपुरी यंत्रणा व नाकर्तेपणामुळे भेसळ प्रतिबंधक कायद्याची पोथी झालेली आहे. भेसळ ही मनुष्य जीवनातील सायलंट किलर्स असून, याबद्दल जनजागृती करण्यासाठी इंडिया अगेन्स्ट सायलेंट किलर्स या संघटनेच्या पुढाकारातून अन्न भेसळ संपविण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. जपानने भारताकडून आयात केलेल्या लसूनमध्ये किटक नाशकांचा अंश सापडल्याने संपुर्ण करार रद्द करण्याची तयारी जपानने जाहिर केली आहे. अशावेळी भारतातील तमाम जनतेच्या आरोग्याला घातक ठरणारी अन्नभेसळ संपविण्यासाठी इंडिया अग्नेस्ट सायलेंट किलर्स या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून कार्य केले जाणार आहे. जनतेशी संपर्क करुन, प्रसार माध्यमे, चौक सभा व गावपातळीवर बैठक घेवून घराघरात अन्नभेसळ शोधण्याच्या पध्दतीचा प्रचार प्रसार केला जाणार असल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. या सामाजिक व जनजागृतीच्या कार्यासाठी अॅड.कारभारी गवळी, अशोक सब्बन, कॉ.बाबा आरगडे, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, सुधीर भद्रे, अंबिका नागुल, हिराबाई ग्यानप्पा, विठ्ठल सुरम आदि प्रयत्नशील आहे.
Post Comment