वनिता राणे बनल्या कल्याण-डोंबिवलीच्या महापौर

सिंधुदुर्ग, दि. 19, मे - कल्याण-डोंबिवली महापौरपदी कुशेवाडा (परुळे) आंबेगाळी येथील मूळ रहिवासी विनिता विश्‍वनाथ राणे यांची बिनविरोध निवड झाली. त्या शिवसेनेच्या महापौर आहेत. वि निता राणे यांच्यामुळे कुशेवाडा गावाला महापौर पदाचा मान मिळाला आहे. त्यांचे पती विश्‍वनाथ राणे हेही नगरसेवक म्हणून कार्यरत आहेत. विशेष म्हणजे राणे यांनी गेली 32 वर्षे नर्सिंगच्या माध्यमातून रुग्णांची सेवा केली असल्याने कल्याण-डोंबिवलीला प्रथमच सेवाव्रती महापौर मिळाला आहे.

कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे महापौरपद सर्वसाधारण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले होते. शिवसेनेतून अनेकजण इच्छुक असताना पक्षश्रेष्ठींनी राणे यांची महापौरपदी वर्णी लावली. त्यांचे पती विश्‍वनाथ राणे तब्बल चारवेळा कल्याण-डोंबिवलीचे नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा राजकारणातील दांडगा अनुभव आणि राणेंनी केलेले सेवाव्रत यामुळे शहराच्या राजकारणावर वेगळाच ठसा उमटेल, अशी आशा आहे. राणे यांनी 2015 मध्ये महानगरपालिकेची निवडणूक प्रथमच डोंबिवलीमधून लढविली. प्रभाग 64 मधून त्या निवडून आल्या. दुस-या सत्रातील अडीच वर्षांच्या कालखंडासाठी त्यांची निवड झाली आहे.
राणे यांचे गाव परुळे-कुशेवाडा-आंबेगाळी असून त्यांचे माहेर सिंधुदुर्गातील मसुरे येथील असून परब आडनाव आहे. वडील गोपाळ परब मुंबईत पोलीस खात्यात होते. त्यामुळे त्यांचे बालपण ग्रँटरोड, लॅमिंग्टन रोड येथील पोलीस वसाहतीत गेले. राणे यांनी 1983 साली मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयात अधिपरिचारिका म्हणून नोकरी पत्करली. 1986 मध्ये विवाह झाल्यानंतर मुंबईकर राणे डोंबिवलीकर झाल्या. राणे यांची महापौरपदी निवड झाल्यानंतर परुळे-कुशेवाडा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती समिती व परुळे गावातून अनेकांनी या दांपत्याचे अभिनंदन केले.