अत्याचार घटनांच्या निषेधार्थ जामखेडमध्ये मुकमोर्चा


पवित्र मंदिरात अपवित्र दूष्कर्म केले आणि त्यांच्या बचावासाठी काही तथाकथित राम भक्तांनी तिरंगा हातात घेऊन श्रीरामांच्या घोषणा दिल्या. या नराधमांनी रामाला व भारतमातेला बदनाम केले. एवढे होऊनही सरकारने कोणतेच कारवाईचे कठोर पाऊल उचलले नाही. हे सरकार गून्हेगारांच्या हिताचे आहे का? कठुआमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर सामुहिक अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली, तसेच उत्तरप्रदेश, गुजरात या ठिकाणांसह देशभरात महिलांवर होत असलेल्या अत्याचारांच्या घटनांच्या निषेधार्थ जामखेड तालुक्यातील सर्वधर्मीय नागरीकांच्या वतीने भव्य मुक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चेकर्‍यांनी सरकार विरोधात तीव्र भावना व्यक्त केल्या. काल दुपारी 3 वाजता खर्डा रोड कॉर्नर येथील जि. प.च्या उर्दु शाळेपासून सदर मुकमोर्चास सुरूवात होऊन, मोर्चा शांततेत तहसील कार्यालयावर जाऊन धडकला. यावेळी मुकमोर्चाचे निषेध सभेत रूपांतर झाले. यावेळी महिला सक्षमीकरण व सर्वधर्मसमभावास चालना देण्यासाठी तसेच या घटनेतील गुन्हेगारांना सरकारने फाशीचीच शिक्षा करावी, तसेच ज्या लोकांनी आरोपींना वाचविण्यासाठी तिरंगा हातात घेऊन मोर्चा काढला त्यांच्यावर तिरंग्याचा अपमान केला म्हणून देशद्रोहाचा गून्हा दाखल करावा, या प्रमुख मागण्या करत मोर्चेकर्‍यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या. नारी सम्मान देश का सम्मान अत्याचारी कोणत्याही धर्माचा जातीचा असो फाशीची शिक्षा झालीच पाहिजे. यासाठी हा मुकमोर्चा काढण्यात आला. मोर्चामध्ये जामखेड तालुक्यातील सर्व धर्मीय नागरिकांसह विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या.
यावेळी मौलाना समीर, प्रा. मधुकर राळेभात, दत्तात्रय वारे, राष्ट्रवादीचे प्रदेश संघटक राजेंद्र कोठारी, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष गोरख दळवी, सामाजिक कार्यकर्ते विकी सदाफुले, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे, शेरखान पठाण, अ‍ॅड. अरुण जाधव, शहाजी राळेभात, मौलाना इबादुल रहेमान मूफ्ती, अफजल पठाण, मौलाना खलील अहमद, हनिफ कूरेशी, हरिभाऊ आजबे, नगरसेवक बिभीषण धनवडे, डिगांबर चव्हाण, अमित जाधव, शामीर सय्यद, मोहन पवार, गुलशन अंधारे, शाकीर खान, डॉ. इंद्रकुमार भिसे, कलिमूल्ला कूरेशी, इम्रान कुरेशी, ताहेरखान पठाण यांच्यासह हजारोंच्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. 
समाज्यातील वाईट प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी आपण एकत्र आलो आहोत. काश्मीर पासुन ते कन्याकुमारीपर्यंत भारतातील मुली सुरक्षित नाहीत. बलत्कारासाठी कडक कायदा झाला पाहिजे, यासाठी संविधानात बदल केला पाहिजे. अत्याचाराची घटना मंदिरात होते, यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट काय आहे? आरोपींना फाशीची शिक्षा होणार हे नक्कीच, पण आम्हाला कायद्यात बदल पाहिजे. गेल्या एक ते दीड वर्षात देशात अत्याचाराच्या घटना घडल्या, यावरून काही लोक जाणीवपूर्वक देशात जातीयवाद वाढवून देशात दूही निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप सर्वच वक्त्यांनी यावेळी केला.