मे पासून मुळा धरणातून सिंचनासाठी उन्हाळी आवर्तन ः आ. मोनिका राजळे

शेवगाव / प्रतिनिधी । मुळा धरणातून उन्हाळी हंगामासाठी 1 मे रोजी आवर्तन सुटणार आहे. मुळा धरणातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आवर्तन निश्‍चित करण्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांचे अध्यक्षतेखाली तसेच जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पालकमंत्री राम शिंदे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्यातील सर्व आमदार व कालवा सल्लागार समितीचे सदस्य यांचे उपस्थितीत रब्बी हंगामासाठी एक तर उन्हाळ हंगामासाठी दोन आवर्तन सोडण्याचा निर्णय दि. 17 नोव्हेंबर 2017 रोजी मुंबई येथील कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. याप्रमाणे रब्बी हंगामाचे तसेच उन्हाळी हंगामाचे एका आवर्तनात सिंचनासाठी योग्यरित्या पाणी मिळाले असून 1 मे रोजी सुटणार्‍या आवर्तनातून शेवटपर्यंतच्या शेतकर्‍याला पाणी मिळणार आहे असे आ. मोनिका राजळे यांनी सांगितले. 


सर्व शेतकर्‍यांना सिंचनासाठी पुरेसे पाणी मिळावे यासाठी रब्बी व उन्हाळी आवर्तनाचा कालावधी वाढवण्यात आला आहे. रब्बी हंगामासाठी मुळा धरणातील 5.07 टीएमसी तर, उन्हाळी हंगामासाठी 8.05 टीएमसी पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी धरण क्षेत्रात पर्जन्यमान चांगले असल्याने मुबलक प्रमाणात पाणीसाठा होता, त्यामुळे शेतीसिंचनासाठी पाणी कमी पडणार नसून येणारे आवर्तन वेळेत पूर्ण क्षमतेने मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सर्व सुस्थितीत असतांना व मतदारसंघात विकास कामे जोमात सुरू असतांना काही मंडळी आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी पाण्याचे राजकारण करून लोकांची दिशाभूल करत आहेत. ज्या भागात इरिगेशन आल्यापासून पाणी गेले नव्हते, त्या भागात पाणी पोहचविण्याचे काम मी केले. आवर्तन आल्यानंतर शेवटपर्यंतच्या सर्व शेतकर्‍यांचे भरणे झाल्याशिवाय पाणी बंद होणार नाही, याची खबरदारी घेण्याचे संबंधीतांना सांगितले असून याकडे माझे व्यक्तिगत लक्ष असल्याचे आ. राजळे यांनी सांगितले.