Breaking News

राष्ट्रपती कोविंद यांना ’इक्वेटोरियल गियाना’चा सर्वोच्च नागरी सन्मान

दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना इक्वेटोरियल गियाना या देशाचा ’सर्वोच्च नागरी सन्मान’ देऊन गौरविण्यात आले आहे. इक्वेटोरियल गियानाचे राष्ट्रपती टेओदोरो ओबियांग न्युएमा म्बासोगो यांच्या हस्ते कोविंद यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद 7 एप्रिलपासून तीन आफ्रिकी देशांच्या पाच दिवसीय दौर्‍यावर आहेत. याच दौर्‍याचा एक भाग म्हणून राष्ट्रपती कोविंद रविवारी इक्वेटोरियल गियाना देशात दाखल झाले. यावेळी एअरपोर्टवर इक्वेटोरियल गियानाचे राष्ट्रपती टेओदोरो ओबियांग न्युएमा म्बासोगो यांनी भारताचे राष्ट्रपती कोविंद आणि त्यांच्या पत्नी सविता कोविंद यांचे स्वागत केले. इक्वेटोरियल गियाना या देशाला भेट देणारे रामनाथ कोविंद हे भारताचे पहिलेच राष्ट्रपती आहेत.