उडीद खरेदी केंद्र बंद झाल्याने अचानक शेतकऱ्यांचा रस्ता रोको


जामखेड/ ता.प्रतिनिधी/ - जामखेड येथे उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र चार दिवसांपासून बंद असल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी शुक्रवार,८डिसेंबर रोजी अचानकपणे खर्डा चौकात एक तास रस्ता रोको आंदोलन केले.
मंडल आधिकारी गोपाळराव मोहळकर यांनी नगर येथील मार्केट फेडरेशन अधिकारी पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जामखेड तहसिल कार्यालयात येण्यास सांगितले त्यामुळे रस्ता रोको आंदोलन माघे घेण्यात आले.

बाजार समितीच्या आवारातील उडीद,सोयाबीन खरेदी केंद्र चार दिवसांपासून बंद आहे. सदर खरेदी केंद्र त्वरित सुरू करावे म्हणून श्रीकृष्ण लोंढे, बंडू खाडे, सोमनाथ दाताळ, अविनाश आढाव, अंकूश खोटे, महेश गर्जे, भिवा वाघमोडे, रावसाहेब शिंदे यांच्यासह शंभरच्या आसपास शेतकऱ्यांनी खर्डा चौकात रस्ता रोको आंदोलन सुरू केले. यावेळी शेतकऱ्यांनी पंधरा दिवसापासून ट्रॅक्टर ट्राली व टेम्पोने शेतकऱ्यांनी आणलेला उडीद घेतला जात नाही. 

त्यामुळे शेतकऱ्यांना दररोजचे वाहनाचे भाडे व पावसाने लावलेली हजेरी तसेच आडत व्यापारी हमीभावापेक्षा दोन ते तीन हजार रुपयांने कमी दराने उडीद खरेदी करीत आहेत. अशा व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांना मार्केट याठिकाणी वेळेवर जेवण नाही, अंघोळ नाही, थंडी मध्ये तिथेच रस्त्यावर झोपायचे, किती शेतकऱ्यांचे अच्छे दिन आले आहे? मोदी सरकार आल्या पासून उलट बुरे दिन आले आहे. असे शेतकरी वर्गामधून बोले जात आहे. शेतकऱ्यांची हे सरकार आल्या पासून खुपच अडवणूक होत आहे. 

यावेळी शेतकरी रस्ता रोको मागे घेत नसल्याने मंडलाधिकारी गोपाळराव मोहळकर यांनी नगरचे मार्केटिंग फेडरेशन अधिकारी भारतभूषण पाटील यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. जामखेड तहसिल कार्यालयात येऊन दखल घ्या. असे म्हणल्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेऊन सर्व आंदोलनकर्त्यांना तहसील कार्यालयात घेऊन गेले.