संगमनेरात खाजगी सावकारीतून होतेय कोट्यावधींची उलाढाल


शहरातील खाजगी सावकारीचा व्यवसाय चांगलाच फोफावला आहे. बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या व्यवसायातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल होत आहे. भिशी, बचतगट आणि विविध फायनांस कंपन्या याद्वारेदेखील मोठी उलाढाल होत आहे. घेतलेले कर्ज वसूल करण्यासाठी संबंधितांना खासगी सावकारांचा मोठा जाच सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिक मेटाकुटीस आले आहेत.
संगमनेर शहरात खाजगी सावकारी करण्याचा परवाना मोजक्याच व्यक्तींकडे आहे. मात्र बेकायदेशीरपणे सावकारीचा व्यवसाय करणारे अनेक ठिकाणी दिसत आहेत. ठराविक मुदतीच्या बोलीने २ पासून २५ टक्क्यांपर्यंत व्याज हे सावकार आकारीत आहे. मोठी रक्कम असल्यास २ टक्के व्याजदर तर छोटी रक्कम असल्यास ५ ते १० टक्के व्याजदर या सावकारांकडून आकारला जातो. 

एखादा नागरिक अतिशय अडचणीत असेल तर काही सावकार त्याच्याकडून २५ टक्के व्याजदर आकारतात. ‘अडला हरी गाढवाचे धरी’ अशी अवस्था संबंधित कर्जदाराची आहे. हे सावकार नेमका याचा गैरफायदा घेऊन वाढीव व्याजदराने पैसे देतात. हे व्याज दर महिन्याच्या ठराविक तारखेला द्यावे लागते. या तारखेला व्याज न दिल्यास आणखी दंडाची रक्कमही आकारली जाते.

मोठी रक्कम असल्यास जमीन, घर, सोन्याचे दागिने गहान ठेवले तरच हे सावकार पैसे देतात. कायद्याच्या चौकटीत राहून या सावकारांचे व्यवहार बिनबोभाट सुरु आहे. १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्रावर ऊसनवारीचा व्यवहार दाखवून संबंधित कर्जदाराला रक्कम दिली जाते. १ लाख रुपयांची रक्कम मंजूर केली जाते. प्रतिज्ञापत्रावर मात्र दिड ते दोन लाख रुपयांची रक्कम ऊसनवारी दिल्याचे दाखविले जाते. यासाठी काही वकीलांचाही सल्ला घेतला जातो. काही वकील खाजगी सावकारांचेच काम करतात, असेही चित्र आहे.

कर्जापोटी दिलेली रक्कम वसूल करण्याची या सावकारांची पद्धत अतिशय वाईट आहे. अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यापासून घरातील वस्तू घेऊन जाण्यापर्यंत या सावकारांची मजल पोहचली आहे. या त्रासाला कंटाळून संबंधितांना नको त्या तडजोडी कराव्या लागत आहेत. महिलांची आर्थिक अडचण लक्षात घेऊन हे सावकार त्यांना ठराविक रक्कम व्याजाने पैसे देतात. वसुलीसाठी नंतर तगादा लावतात. वेळेत पैसे न आल्यास या महिलांना ते अपशब्द वापरतात. ‘भिक नको पण कुत्रा आवर’ अशी अनेक महिलांची अवस्था झाली आहे. या महिलांच्या आर्थिक अडचणीचा गैरफायदा काही सावकारांकडून घेतला जात आहे.

शहरातील काही प्रतिष्ठीत व्यक्ती खुलेआम खाजगी सावकारकीचा व्यवसाय करत आहेत. यातून ते लाखो रुपयांची माया जमा करत आहे. संबंधित खात्याने गावोगावी जाऊन या खाजगी सावकारांचा सर्वे करावा व त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून केली जात आहे. दरम्यान, येथील खासगी सावकारांकडून गरीब जनतेची पिळवणूक केली जाते. कित्येक लोकांचे उदरनिर्वाहाचे साधन खासगी सावकार लोकांनी दादागिरी करून हिरावून एकप्रकारे जप्ती आणल्याचे सचिन वर्मा यांनी सांगितले. {पान २ साठी}