प्राचीन आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालून शास्त्रज्ञांनी समन्वयाचा पूल उभारावा
येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चंद्रशेखर सभागृहात राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या (एनएएसआय) ८७ व्या वार्षिक सत्रानिमित्त “बेसिक रिसर्च : इटस् रोल इन नेशन डेव्हलपमेंट” या परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या वार्षिक सत्राचे उद्घाटन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय विज्ञान अकादमीचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर, इस्त्रोचे चेअरमन डॉ. किरण कुमार,पद्मविभूषण डॉ. मंजू शर्मा, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर,राष्ट्रीय विज्ञान अकादमीच्या पुणे विभागाचे अध्यक्ष प्रा. दिलीप ढवळे, एनएसआयच्या सचिव डॉ. वीणा टंडन आदी मान्यवर उपस्थित होते.
राज्यपाल चे. विद्यासागर राव म्हणाले, भारतीय विज्ञानाला मोठी परंपरा आहे. एकेकाळी भारतीय विज्ञान सर्वात अग्रेसर होते. मात्र परदेशी वर्चस्वामुळे भारतीय विज्ञानाला झाकोळून टाकले आहे. प्राध्यापक एम.जे.के. मेनन, प्राध्यापक एम.एस. स्वामीनाथन आणि आता डॉ. अनिल काकोडकर यासारख्या शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय विज्ञान अकादमीने भरीव काम केले आहे. त्यामुळे भारत विज्ञान क्षेत्रातील आपले पूर्वीचे अव्वल स्थान पुन्हा प्राप्त करेल. विज्ञानाच्या मदतीनेच भारत गरिबी, उपासमार, अज्ञान, रोगराई, अस्वच्छता, कुपोषण, पाणी आणि ऊर्जा सुरक्षा यासारख्या आव्हानांना सामोरे जाऊ शकतो. गेल्या काही दशकांत भारताने माहिती तंत्रज्ञान,स्पेस सायन्स, न्यूक्लियर सायन्स, फार्मास्युटिकल्स, मेडिसीन आणि इतर क्षेत्रात क्षेत्रात मोठी प्रगती केलेली आहे.
Post Comment