...तर नितीनच्या खर्‍या मारेकर्‍यांना फासावर लटकावण्याची हिम्मत दाखवा....

लोकमंथनच्या भूमिकेचे स्वागत; 
बहुजन संघटना एकवटल्या
मराठा क्रांती मोर्चाकडून प्रतिसादाची प्रतिक्षा
आगे कुटुंबाचे व्यवस्थेला आर्त आव्हान.



नितीन आगेच्या खुनातील संशयीत निर्दोष ठरविणार्‍या व्यवस्थेने खर्‍या मारेकर्‍यांना फासावर लटकावण्याची हिम्मत दाखवावी असे आर्त आव्हान मयत नितीन चे वडील राजू आगे यांनी केले आहे. या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी.अन्यथा न्याय मिळत नसेल तर पोलीस ठाण्यासमोर आत्महत्या करू असा इशाराही आगे कुटूंबाने दिला आहे. 

दरम्यान काल दै.लोकमंथनने घेतलेल्या भुमिकेचे तमाम बहुजनांनी स्वागत करून आगे कुटूंबाला न्याय देण्यासाठी सर्व संघटना एकवटल्या आहेत. तथापि या संघर्ष लढाईत अजूनही बहुजन महाराष्ट्राला मराठा क्रांती मोर्चाची प्रतिक्षा आहे.

प्रेम प्रकरणातून दि.29 एप्रिल 2014 रोजी खर्डा येथील नितीन आगे या तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणातील सर्व दहा आरोपी तीन वर्षानंतर निर्दोष सुटल्याने आश्‍चर्य मिश्रीत प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हा धागा पकडून दै.लोकमंथनने नितीन आगेचे मारेकरी निर्दोष सुटत असतील तर त्याने स्वतः स्वतः खून केला ? हे संशयीत खरोखर निर्दोष असतील तर खर्‍या मारेकर्‍यांचा शोध घेण्याची जबाबदारी कुणाची ? अशा आशयाचे प्रश्‍न खून नैसर्गिक न्यायाचा या सदरातून बहूजन महाराष्ट्रासमोर उपस्थित केले होते. 

खर्‍या मारेकर्‍यांना शोधून त्यांना फासावर घेऊन जाण्यासाठी बहुजन महाराष्ट्राने संघर्ष छेडावा आणि या संघर्षाचे नेतृत्व मराठा क्रांती मोर्चाने करावे असे आवाहनही या सदरात लोकमंथनने केले होते. दै.लोकमंथनच्या या प्रयत्नांना यश येतांना दिसत असून आगे प्रकरणाच्या निमित्ताने नैसर्गिक न्यायाच्या खून्यांना पकडण्यासाठी बहूजन संघटनांमध्ये संघभावना वाढीस लागण्याचे संकेत मिळू लागले आहेत. 

मयत नितीनचे वडील राजू आगे यांचाही आत्मविश्‍वास वाढला असून लोकमंथनच्या भुमिकेमुळे धीर आलेल्या मयताच्या पित्याने थेट व्यवस्थेला आव्हान देत खर्‍या मारेकर्यांना पकडून फासावर देण्याचे आर्जव केले आहे.

संशयित निर्दोष सुटल्यानंतर पहिल्यांदाच व्यक्त होणारे राजू आगे लोकमंथनशी बोलतांना म्हणाले की, माझ्या मुलाची आत्महत्या नसून त्याची निर्घृण पणे हत्या करण्यात आली आहे त्यावेळी माझ्या समाजासह विविध संघटनांनी मला साथ दिली मात्र सरकारकडून मला कसलीच साथ मिळाली नाही खुनातील सुटलेले आरोपी निर्दोष असतील तर खरे आरोपी पकडून त्यांना सरकारने आम्हाला न्याय द्यावा अन्यथा येत्या आठ दिवसांत आम्ही आगे कुटुंब पोलिस स्टेशन समोर आत्महत्या करणार असल्याचा इशारा नितीन आगे यांचे वडील राजू आगे यांनी दैनिक लोकमंथनशी बोलतांना दिला. 

उद्विन राजू आगे पुढे म्हणाले, माझ्या मुलाची हत्या करणारे निर्दोष सुटले असले तरी मी उच्च न्यायालयात दाद मागणार आहे आरोपी सुटले तर मग खरे आरोपी पकडून द्यावेत या संदर्भात लोकमंथनने केलेल्या आवाहनानःतर सर्व बहूजन सःघटनांना एकवटून आगे कुटुंबाच्या पाठीशी ठाम उभ्या राहील्या असून या संदर्भात तहसीलदार विजय भंडारी व जामखेड पोलिस स्टेशन ला नव्याने रूजू झालेले पोलिस उपधिक्षक सोनाली कदम यांना निवेदनही दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की सदर प्रकरणातील मयत नितीन आगे यांची ज्या आरोपींनी हत्या केली त्यांचा तपास सी. बी. आय कडे सोपविण्यात यावा व सदरील प्रकरणात फितूर झालेले साक्षीदार यांची चौकशी करून यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी व ऑट्रासिटी ऑक्ट दाखल करताना हलगर्जीपणा करणाञा पोलिस अधिकार्‍यांवर कारवाई करण्यात यावी आणि लवकरात लवकर सदर प्रकरणातील गुन्हेगारांना अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी व तसेच निर्दोष सुटलेल्या आरोपी कडून मला व माझ्या कुटुंबांना धोका असून आम्ही सर्व कुटुंब दहशतीखाली वावरत आहोत अशी भिती मयत नितीन आगे यांचे वडील राजू आगे यांनी व्यक्त केली आहे.

जर त्या आरोपींवर कठोर कारवाई नाही केली तर जामखेड तालुक्यातील सर्व आंबेडकरी पक्ष, संघटना व समक्ष भिमसैनिक च्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन छेडण्याचा असा इशारा रिपाई चे जिल्हा अध्यक्ष सुनिल साळवे, लोक अधिकार आंदोलन चे प्रदेशाध्यक्ष डॉ अरूण जाधव, विकी सदाफुले, रिपाइंचे युवक जामखेड तालुका अध्यक्ष बाबा सोनवणे, बापुसाहेब गायकवाड, विकी घायतडक, रवि सोनवणे, संतोष गव्हाळे, मिलींद भोसले, संतोष सोनवणे, बापू ओहोळ, सचिन सदाफुले, किशोर कांबळे, योगेश सदाफुले, सोमनाथ गायकवाड, आतिश पारवे, सागर तुपेरे, देवा मोरे, विजय तुपेरे, अजिनाथ समुद्र, जिवन कांबळे, मुकुंद घायतडक, योगेश आब्दुले, जोंगद्र थोरात, सनी सदाफुले, रोहित राजगुरू, पोपट साळवे, सिद्धार्थ पारवे यांनी इशारा दिला व काय अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार शासन राहील असा पण इशारा देण्यात आला आहे. 

दरम्यान या संघर्षात मराठा क्रांती मोर्चाने आगे कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून नितीनच्या मारेकर्यांना सजा होण्यासाठी सहकार्य करावे.बहुजन महाराष्ट्राला क्रांती मोर्चाकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे अशा प्रतिक्रिया बहुजन महाराष्ट्रातून उमटत आहेत.

नितीन आगे खून खटल्यामध्ये सर्व आरोपी सवर्ण आहे. त्यामुळे दलित समाजामध्ये भयभीतता निर्माण झालेली आहे . साक्षीदार फुटल्यानेच आरोपी निर्दोष सुटले आहे. जे साक्षीदार फुटले त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे . सरकारने या खटल्याची फेर न्यायालयीन चौकशी करावी.
- आरती बढेकर, जिल्हा महिला अध्यक्षा, रिपाइं (ए).

अपेक्षा ठेवायच्या कोणाकडून ?
नितीन आगेचा खुन त्या आरोपींनी केला नाही तर कुणी गेला ? याचा तपास होने आवश्यक आहे. प्रिंट मिडिया, इलेक्ट्रॉनिक मिडिया, सोशल मिडियावर साक्षीदार फितूर झाल्याच उघड उघड बोलल जातय, याच काय ? न्याय व्यवस्था जर दबावात काम करत असेल, आणि जात पात पाहून न्यायदान करणार असेल तर अपेक्षा कोणाकडून ठेवायच्या ? परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे एका खटल्यात निकाल दिला गेला, याबाबत न्याय व्यवस्थेचे अभिनंदनच आहे. परंतू, त्याच दरम्यान दुसर्‍या नितीन आगे खून खटल्यात पुराव्या अभावी आरोपींची निर्दोष मुक्तता करणे, हे कोणत्या तत्वात बसत ? 

आजही महाराष्ट्रातील खैरलांजी, सोनई, शिर्डी ही प्रकरण न्यायाच्या प्रतिक्षेत आहेत, यात गांभिर्याने विचार होण गरजेच आहे. उघड उघड विष पेरण्याच काम या निमित्तानं होत आहे, यावर विचार करने काळाची गरज बनली आहे. आपली न्याय व्यवस्था आरोपीला आपली बाजू मांडण्याची पुरेपूर संधी देत असते, त्याची जर वकिल देण्याची परिस्थिती नसेल तर वकिल पण उपलब्ध करुन देते, मग आरोपींची बाजू मांडून न्यायदानात महत्वाची भुमिका बजावणा-या वकिलांना धमक्या येतात, आणि त्याबाबत कोणाला काहीच घेण-देण नाही. 

वकिल बार असोसिएशन जाणून-बुजून शांत बसते , ही कसली मानसिकता ? जर त्या आरोपींची बाजूच मांडायची नव्हती तर मग कशाला विशेष सरकारी वकिल आणि फौजदारी प्रक्रिया संहिता ? डायरेक्ट निकाल द्यायला हवा होता ना ? मकासरें सारख्या सिनिअर वकिलाशी ज्या पध्दतीने भाषा वापरली ती अत्यंत घृणास्पद आहे. ऑडिओ क्लिप यु ट्यूबवर अपलोड केलेली आहे, त्या खालील कमेटस् दोन समाजामध्ये तेढ निर्माण करणार्‍या आहेत. जातीय तेढ निर्माण होत असताना महापुरुषांवर अत्यंत खालच्या पातळीवरुन टिका टिप्पणी केली जात आहे, यावर प्रशासनाने बंधन आणणे आवश्यक आहे.
-अ‍ॅड. संतोष गायकवाड.

आज नाही तर पुन्हा कधीच नाही.
नितीन आगे हत्या प्रकरणातील सर्व आरोपी निर्दोष सुटले. न्यायालयावर विश्‍वास कसा ठेवावा? हाच मोठा प्रश्‍न पडला आहे. पोलिसांनी भक्कम पुरावा का सादर केला नाही. घटना घडल्यानंतर सरकारने नितीन आगे च्या कुटुंबाच्या मागे भक्कम उभे राहायला पाहिजे होते. मात्र तसे काय झाले नाही सरकारने या आगे गरीब कुटुंबाच्या मागे उभे राहण्याची गरज आहे.- सुनिल साळवे, जिल्हा अध्यक्ष, रिपाई
आगे प्रकरणात आम्ही न्यायाच्या प्रतिक्षेत होतो. मात्र योग्य न्याय मिळाला नाही. यासाठी आम्ही आता योग्य न्याय मिळण्यासाठी सर्वांना बरोबर घेणार आहे.
- कॉ.अरुण जाधव


महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन. 
खर्डा येथील दलित युवक नितिन आगे या युवकाची निर्घृण जातीयवादी गावगुंडानी हत्या केली. सबळ पुरावे आसतांना आणि सरकारने केलेली दिरंगाई यामुळे आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे . पुढे सोनई ,शिर्डी असे बरेच निकाल बाकी आहे. त्या साठी सरकारवर दबाव वाढविण्यासाठी व् समाजात एकोपा राहण्यासाठी, दलित समाजाची पुढील दिशा व् आगे प्रकरणात पुढे काय करता येईल? या साठी सर्व दलित संघटना ,फुले -शाहू -आंबेडकर चळवळीतील सर्व संघटना व् कार्यकर्ते आणि भीमसैनिकांची महत्वपूर्ण बैठक अहमदनगर जिल्हा सर्व आंबेडकरी व् दलित समाजच्या वतीने आज 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 12.00 वाजता पंचशील विद्या मंदिर प्राथमिक शाळा या ठिकाणी आयोजित केली आहे.  - सुमेध गायकवाड, रिपाई.

आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्महत्या करणार. 
माझ्या मुलावर अन्याय झाला असून माझ्या मुलाचा खुन करून तरी पण न्यायालयाने आरोपी ना निर्दोष सोडून दिले सरकारने न्याय देण्याचे आश्‍वासन दिले होते मात्र तसे काय घडले नाही सरकार ने आमच्या शी बोगसगिरी केली आहे आमचे कुटुंब दहशतीखाली आहे आता आमच्या कडे आत्महत्या शिवाय दुसरे काय पर्याय नाही आम्हाला न्याय नाही मिळाला तर आम्ही आत्महत्या करणार. - राजू आगे, मयताचे वडील

ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी दैनिक लोकमंथन चे फेसबुक पेज लाईक आणि ट्विटर वर फॉलो करा