यूपीत विषारी दारूचे १० बळी.
कानपूर : उत्तर प्रदेशातील दोन जिल्ह्यांत विषारी दारूचे सेवन केल्याने १० जणांचा बळी गेल्याची माहिती रविवारी पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेत प्रकृती बिघडलेल्या १६ जणांवर उपचार सुरू असल्याचेही पोलीस म्हणाले. या प्रकरणानंतर दोन्ही जिल्ह्यात अवैध मद्यविक्री करणाऱ्या ५ आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर मुख्य आरोपी अद्याप फरार आहे.
कानपूर जिल्हा व कानपूर देहात या दोन ठिकाणी विषारी दारूने मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या. कानपूर जिल्ह्यातील एका गावात विषारी मद्यप्राशन केल्यानंतर शनिवारी सकाळी चौघांचा मृत्यू झाला. तर उपचार सुरू असताना रविवारी आणखी एक जणांचा बळी गेला. दुसरीकडे, कानपूर देहात जिल्ह्यातील माहीपूर्व व भंवरपूर गावात विषारी मद्य पिल्याने ५ जणांचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल संवेदना व्यक्त करताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी २ लाख रुपयांची मदत जाहीर केल्याची माहिती यावेळी कानपूरचे जिल्हाधिकारी सुरेंद्र सिंग यांनी दिली. दोन्ही जिल्ह्यांत अवैध मार्गाने मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात पोलीस दलाने कारवाई सुरू करीत पाच आरोपींना ताब्यात घेतले. तर मुख्य आरोपीला पकडण्यासाठी पोलीस पथक नेमण्यात आले आहे..
Post Comment