परदेशी चार्टर्ड विमानांना एका दिवसात मंजुरी देण्याचा प्रस्ताव.


नवी दिल्ली : परदेशामध्ये नोंदणी केलेल्या चार्टर्ड विमानाला देशामध्ये ये-जा करण्यासाठी मंजुरी देण्याचा काळ कमी करून एक दिवसाचा करावा, यासाठी एका प्रस्तावावर नागरी हवाई वाहतूक संचालनालय विचार करत आहे. यामुळे बड्या उद्योजक, उच्च उत्पन्न असणाऱ्यांना मोठा दिलासा मिळू शकणार आहे. संचालनालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, या प्रकारामध्ये अनेक श्रेणी व वर्ग असून त्या अनुषांगाने हा प्रस्ताव देण्यात आला आहे. 

संबंधित व्यक्ती, संघटना व सुरक्षा संस्था यांच्याशी चर्चा केल्यानंतर यावर अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर अनेक मोठे उद्योजक, अधिकारी, उच्च उत्पन्न असणारे प्रवासी यांना मोठा दिलासा मिळेल. ऐनवेळी होणाऱ्या विमान प्रवासांना मंजुरी मिळेपर्यंत त्यांना वाट पाहावी लागणार नाही, अन्यथा त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. सुरक्षाविषयक कारणामुळे या प्रस्तावावर सचिवांच्या समितीकडून विचार केला जाण्याची शक्यता आहे. मात्र, तरीही मंत्रालयाला या प्रस्तावावर मंजुरी मिळेल, अशा अपेक्षा आहे..