मूलभूत सुविधांसाठी ७ कोटींचा निधी मंजूर : आ. राजळे


शेवगाव / प्रतिनिधी  - मतदारसंघातील गावांतर्गत मूलभूत सुविधांसाठी सन २०१७-१८ या वर्षाकरिता ७ कोटी ३३ लक्ष रुपयांचा सर्वाधिक निधी राज्याचे मुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी मंजूर केला आहे, अशी माहिती आ. मोनिका राजळे यांनी दिली.

त्या म्हणाल्या, सत्तेचा वापर जनसेवेसाठी करण्याचा मूलमंत्र राजळे परिवाराने दिला आहे. त्यानुसार मतदारसंघातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर जास्तीत जास्त भर दिला आहे. तालुक्यातील विकासकामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी आगामी काळात प्रयत्न केले जाणार आहे. त्यासाठी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे भरीव निधीची मागणी केली होती. शासनाचे ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या दि. ३१ मार्चच्या शासननिर्णयाप्रमाणे सदर अनुदान उपलब्ध झाले आहे. मंजूर कामांच्या यादीतील संदर्भाधीन शासननिर्णयान्वये प्रशासकीय आणि तांत्रिक मंजुरी, निविदा काढणे / स्विकारणे आदी जबाबदारी सार्वजनिक बांधकाम मंडळ आणि जिल्हा परिषदेवर सोपवण्यात आली आहे. 

शेवगांव - पाथर्डी मतदारसंघातील ग्रामीण भागातील गावांत रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे, सामाजिक सभागृह बांधकाम, गावांतर्गत रस्ते, रस्ते काँक्रीटीकरण, पेव्हिंग ब्लॉक, चौक सुशोभीकरण, पथदिवे, स्वरक्षण भिंत बांधणे आदी विविध विकासकामांसाठी हे अनुदान उपलब्ध झाले आहे. ही विकासकामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येतील. मतदारसंघाच्या विकासासाठी ग्रामविकासमंत्री मुंडे आणि पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या सहकार्याने भरघोस निधी मिळाला आहे. मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आ. राजळे यांनी यावेळी सांगितले.