Breaking News

दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना वैद्यकिय क्षेत्राने दिलासा द्यावा - ना.तुपकर

 बुलडाणा  । 29 - यंदाचे वर्ष दुष्काळाचे आहे. दुष्काळ डोळयाने दिसत नसलातरी जगणार्‍याला तो जाणवतो. ज्यांच्या उपचाराने गुण येतो अशा खाजगी वैद्यकिय तज्ञांकडे जाण्याची इच्छा असली तरी केवळ दुष्काळी परिस्थीतीत आर्थिक विवंचनेमुळे ते उपचार घेऊ शकत नाही. जगाचा पोशिंदा असणार्‍या या शेतकर्‍याची जाणीव ठेवू वैद्यकीय क्षेत्राने उपचार शुल्कात सवलत देवून त्यांना दिलासा द्यावा असे आवाहन वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे केले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त स्थानिक श्री साई दातांचा दवाखाना येथे 26 जानेवारी रोजी प्रसिध्द दंतरोग तज्ञ डॉ.प्रकाश अंभोरे यांचे वतीने आयोजित मोफत दंत चिकित्सा व औषधोपचार शिबीराचे  उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे तुपकर बोलत होते. साईसृष्टी गृहनिर्माण प्रकल्पाचे संचालक प्रल्हादराव बरबडे, शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे जिल्हा अध्यक्ष संतोष राजपूत, जिल्हा पत्रकार संघाचे राजेंद्र काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. महात्मा गांधी व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून  व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख भाषणात पुढे बोलतांना रविकांत तुपकर म्हणाले की, डॉ.प्रकाश अंभोरे व त्यांच्यासारखे कार्य करणारे अनेक लोक या समाजात असल्याने शेतकरी वर्गाने खचून जावू नये. आजच्या परिस्थीतीपेक्षाही विदारक परिस्थिती आपल्या आजोबा, पणजोबांच्या काळात होती. मात्र त्यांनी कधीही आत्महत्या केली नाही. जीवन सुदंर आहे ते आणखी सुदंर करण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू असे सांगून त्यांनी चुकूनही आत्महत्येचा चुकूनही विचार मनात आणू नका, असे कळकळीचे आवाहन शेतकर्‍यांना केले. दरम्यान शिबीरात आलेल्या 147 दंत रूग्णांची मोफत तपासणी करून त्यांना 42 हजार रूपयांची औषधी मोफत वाटप करण्यात आले. महाराष्ट्र सेल्स अ‍ॅण्ड मेडिकल रिप्रेझॅटेटिव्ह असो. च्या वतीने महेश शर्मा यांनी इंडियन डेंटल असो.च्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ.प्रकाश अंभोरे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देवून सत्कार केला. आरंभी प्रतिभा क्षिरसागर आणि ज्योत्स्ना नागरे यांनी स्वागत गीत सादर केले. प्रास्ताविक विजय ठोसर यांनी केले तर सुत्रसंचालन शशिकांत इंगळे यांनी केले.