‘ऑनलाईन गॅम्बलिंग'च्या नावाखाली संगमनेरात जुगार! तरुणाई होतेय कंगाल

शहरातील तरुणाईत सध्या ऑनलाईन गॅम्बलिंगची जबरदस्त ‘क्रेज’ पहायला मिळत आहे. बेरोजगार तरुण हातात मोबाईल घेऊन किंवा शासनमान्य ऑनलाईन लॉटरी सेंटरच्या नावाखाली चालणारी स्वयंचलित ऑनलाईन 'लोटो' सेंटर संगमनेरात नव्याने बघावयास मिळू लागली आहेत. या ऑनलाईन लॉटरी सेंटरवर शासन मान्यताप्राप्त ‘लॉटरी’ म्हणजेच राजश्री लॉटरी, गोल्डन लॉटरी यांच्या नावाखाली स्वयंचलित ऑनलाईन लॉटरी निकाल पद्धतीने काढली जातात. यात ग्राहक शासनमान्य सरकारी लॉटरी समजून खेळतो आणि आर्थिकदृष्ट्या फसला जात आहे. अशा ऑनलाईन जुगाराच्या प्रकारात रोजची लाखोंची उलाढाल होत आहे. 

'रोलेट' नावाच्या प्रचलित ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवर खेळला जाणारा जुगाराचा हा प्रकार आहे. या खेळासाठी एजंटांकडे पैसे देऊन बॅलन्स विकत घेतला जातो आणि बेटिंग केली जाते. बेटिंगचा निकालही ऑनलाईन पद्धतीने काढला जात आहे. त्यामुळे यात कुणी जिंकण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. अशा प्रकारे दिवसाढवळ्या सामान्य नागरिकांच्या आणि तरुणांच्या खिशात हात घालून आर्थिक लूट सुरु आहे. पोलीस प्रशासन तसेच सायबर गुन्हे शाखा यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केले करतांना दिसत नाही. ज्यावेळी पोलीस प्रशासन समाजात घडणाऱ्या एखाद्या घटनेतून किंवा कृतीतून संभाव्य कायदा सुव्यवस्थेला निर्माण होणार धोका ओळखून समाजात फोफावणाऱ्या अशा प्रवृत्तींना किंवा अशी परिस्थिती निर्माण करणाऱ्या व्यक्तींवर वेळीच कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात ठेवतात , अशाच प्रकारे पोलीस प्रशासन किंवा सायबर गुन्हे शाखेने हा कायदा सुव्यवस्थेचा धोका ओळखून अशा पद्धतीने चालणाऱ्या जुगाराच्या साखळीचा पर्दाफाश करणे गरजेचे बनले आहे. त्यातच हा सर्व जुगाराचा काळा बाजार ऑनलाईन पद्धतीने होत आहे. तरीदेखील नगरच्या सायबर गुन्हे शाखेला या सर्व प्रकारची अद्यापपर्यंत खबर सुद्धा लागली नसावी, याचेदेखील नवलच आहे.