लोकसभेला शिर्डीत काँग्रेसकडून आ. कांबळे श्रीरामपूरमधून विधानसभेला ओगले
शिर्डी मतदार संघातून शिवसेनेकडून लोकसभा निवडणुकीमध्ये यापूर्वी माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे,निवडून आले. त्यानंतर त्यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये जाऊन शिर्डी लोकसभा निवडणूक लढवली. पंरतु मतदार त्यावेळी वाकचौरे यांच्यावर प्रचंड नाराज होते. त्यामुळे अवघे १२ दिवस प्रचार करणारे सदाशिव लोखंडे या लोकसभा मतदार संघातून निवडून आले. शिर्डी मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष या लोकसभा मतदार संघातून आ. कांबळे यांना तिकिट देऊ शकते. श्रीरामपूरच्या जागेवर भारतीय युवक काँग्रेस सचिव हेमंत ओगले हे निवडणूक लढवू शकतात. आ. कांबळे हे सलग दोनदा या मतदार संघातून विजयी झाले आहेत. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे कांबळे यांना लोकसभेची उमेदवारी देऊ शकतात. राज्यात सध्या भाजपविरोधी लाट आली आहे. याचा काँग्रेस पक्षाला निश्चित फायदा होऊ शकतो. दरम्यान, या लोकसभा मतदार संघातून केंद्रीयमंत्री रामदास आठवलेदेखील निवडूक लढविण्यासाठी चाचपणी करत आहेत. माजी खा. वाकचौरे हेदेखील भाजपक कडून इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे शिवसेनेचे लहू कानडे, बबनराव घोलप याचीही नावे चर्चेत आहेत. मात्र कोणाला तिकिट मिळते आणि ते कोणता पक्ष देईल, यासाठी प्रत्येकजण कामाला लागले आहे.
वाकचौरे विधानसभा लढविणार?
पंतप्रधान मोदी यांनी स्पष्ट केले आहे, की मंत्रीपद हवे असले तर जनतेतून निवडून यावे लागेल. त्यामुळे केंद्रीयमंत्री रामदास आठवले हे शिर्डीतून चाचपणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रीपदासाठी स्वतःला सिद्ध करण्याकरीत माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे हेदेखील श्रीरामपूर विधानसभा लढवणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.