महाराष्ट्रात १६ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार


 मार्च २०१८ पर्यंत देशात २५१ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होणार असून महाराष्ट्रात १६ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र लवकरच सुरू करण्यात येतील अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी दिली आहे.

देशातील नागरिकांना त्यांच्या जिल्ह्यातच पासपोर्ट मिळावा यासाठी विदेश मंत्रालयाने “पासपोर्ट आपल्या दारी” या तत्वानुसार देशभरात २५१ पासपोर्ट केंद्र उभारण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. यामध्ये महाराष्ट्रात 20 नवीन पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील 6 महिन्यात देशभरात ६२ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र उभारण्यात आले आहेत. यातील ४ पासपोर्ट सेवा केंद्र महाराष्ट्रातील सोलापूर, औरंगाबाद, कोल्हापूर व पिंपरी चिंचवड येथे सुरू करण्यात आली आहेत. गेल्या ७० वर्षात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात पासपोर्ट केंद्र उभारण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.


ही असतील राज्यातील १६ नवीन पासपोर्ट सेवा केंद्र
महाराष्ट्रात जी नवीन १६ पासपोर्ट सेवा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत यामध्ये सिंधुदुर्ग, वर्धा,जालना, लातूर, अहमदनगर, पंढरपूर, सांगली, बीड, मुंबई नॉर्थ सेन्ट्रल, मुंबई साऊथ सेंट्रल,घाटकोपर, नवी मुंबई, डोंबिवली, पनवेल, नांदेड व जळगाव या ठिकाणांचा समावेश आहे. या १६ नवीन पासपोर्ट केंद्रामुळे राज्यात पासपोर्ट केंद्रांची एकूण संख्या २७ होणार आहे.