Breaking News

डहाणू, जव्हार आणि तळोद्यामध्ये १३ ऐवजी १७ डिसेंबरला मतदान


मुंबई : पालघर जिल्ह्यातील डहाणू व जव्हार आणि नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सुधारीत कार्यक्रमानुसार आता 13 डिसेंबर 2017 ऐवजी 17 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी आज येथे दिली.
श्री.सहारिया यांनी सांगितले की, या नगरपरिषदांच्या नामनिर्देशनपत्रांसदंर्भातील न्यायालयांचे निकाल आणि संबंधित अधिनियमातील तरतुदी लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. या बदलानुसार तीन ठिकाणी 17 डिसेंबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल. 18 डिसेंबर 2017 रोजी मतमोजणी होईल.

त्याचबरोबर खोपोली नगरपरिषदेच्या प्रभाग क्र.6-अ च्या रिक्त पदाच्या पोटनिवडणुकीसाठी देखील 13 डिसेंबर 2017 ऐवजी 17 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या पूर्व नियोजित कार्यक्रमानुसार इगतपुरी, त्र्यंबक (जि. नाशिक) व जत (जि. सांगली) नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 10 डिसेंबर 2017 रोजी मतदान होणार आहे.