Breaking News

बोंडअळीच्या पंचनाम्यास प्रारंभ शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले

कोपरगाव ता. प्रतिनिधी - दरवर्षी कुठल्या ना कुठल्या संकटाचा सामना करत शेतकरी त्यातून पायवाट काढत कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटांचे चटके सोसत आहेत. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवित असताना यंदाही कापूस पिकावर आलेल्या शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भावाने मनात आखलेले आर्थिक आराखडे पुन्हा भुईसपाट झाले आहेत. 


उत्पन्न निम्यावर आल्यामुळे या दुःखावर शासन मायेची फुंकर घालील की नाही, हाच खरा प्रश्न आहे. सध्या बळीराजाच्या समाधानासाठी कोपरगाव तालुका कृषी विभागाने बाधित कापूस क्षेत्राची पाहणी करुन पंचनामा करण्यास सुरुवात केली आहे. मात्र तक्रार देण्यासाठी शेतकरी उदासिन असल्याचे हाती आलेल्या आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

तालुक्यात एकुण ३ हजार १०६ हेक्टर कापूस पिकाखालील क्षेत्र असून संपूर्ण कापूस पिक शेंदरी बोंडअळीच्या प्रादूर्भावाने बाधित झाले आहे. सध्या कृषी विभागाच्या एकूण पाच मंडळातील कोपरगाव : २८, पोहेगाव : ६, रवंदे : ५ अशा एकूण ३९ असून सुरेगाव आणि दहेगाव (बो) मंडळात एकही तक्रार आलेली नाही. केवळ ३५.२९ हेक्टरच्या कालपर्यंत {दि.७} तक्रारी दाखल झाल्या आहेत. 

त्यामुळे तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्यासह कृषी मंडल अधिकाऱ्यांनी गावोगाव जाऊन प्रत्यक्ष नुकसानीची पाहणी करुन पंचनामे सुरु केले आहेत. परंतु याबाबत अद्याप तरी शासनाने ठोस भूमिका घेतलेली नाही. कर्जमाफीचे वाजलेले तीन-तेरा आणि अवकाळी पावसाने मका, सोयाबीनच्या नुकसानीत शासनाने धतुराही दिला नाही. त्यामुळे आताही कागदी घोडे नाचवून पदरात काहीच पडणार नाही. केवळ कृषी विभागाकडून शेतकऱ्यांच्या समाधानासाठी ही पाहणी असावी, असा सर्वांचा यापूर्वीचा अनुभव आहे.

बळीराजाचा उडत चाललाय मागील वर्षीही सोयाबीनच्या पिकात शेंगाच न आल्याने उभ्या पिकांत नांगर फिरावावा लागला. कृषीतज्ञांना त्याची उकल झाली नाही. पंचनामे झाले. अधिकाऱ्यांची या निमित्ताने सहल झाली. आठ दिवसांचा शो करुन शेतकऱ्यांना फुटकी कवडीदेखील मिळाली नाही. यंदाही बनावट बियाणे आणि किटकनाशकांनी शेतकऱ्यांचा जीव घेतला. तक्रारी करुनही कारवाई शून्यच असल्यामुळे या व्यवस्थेवरील बळीराजाचा विश्वास उडत आहे.