बोंडअळीच्या नुकसान भरपाईसाठी शेतक-यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

औरंगाबाद, दि. 25, नोव्हेंबर - बोंड अळीबाधीत कपाशीची हेक्टरी 1 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, या मागणीकरीत संतप्त शेतक-यांनी विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयात अचानक बैठकीत शिरुन आत्मदहनाचा प्रयत्न केला. गंगापूर तालुक्यातील वजनापूर या गावातील सात ते आठ शेतक-यांनी बाटलीत आणलेले रॉकेल अंगावर टाकल्याने एकच गोंधळ उडाला. 



राज्याचे फलोत्पादन संचालक व येथील पालक संचालक प्रल्हाद पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहानुरमिया दर्गा परिसरातील कार्यालयात आढावा बैठक सुरु होती. विभागातील सर्व अधिकारी बैठकीला हजर होते. सकाळी 11.30 ते दुपारी 12 वाजे दरम्यान जि.प.चे माजी अर्थ व बांधकाम सभापती संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली 15 ते 20 शेतकरी घोषणा देत अचानक कार्यालयात आले.

 शेतक-यांच्या हातात बोंडआळी लागलेली कपाशीच परदड होते. काही शेतक-यांनी कपाशीच्या बोंडाचे तोरण कार्यालयाला बांधले. ‘ सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय’ असा घोषणा देत सर्वजण थेट बैठकीमध्ये शिरले.