Breaking News

चोरी प्रकरणी मैनुद्दीन मुंबई पोलिसांच्या ताब्यात

सांगली, दि. 26 -  वारणानगर (ता. पन्हाळा) येथील वारणा शिक्षण मंडळाच्या शिक्षक कॉलनीतून तीन कोटींची रोकड चोरल्याप्रकरणी अटकेत असलेल्या मैनुद्दीन ऊर्फ मोहिद्दीन मुल्ला यास मुबईत पोलिसांनी ताब्यात घेतले. मुंबईत 2014 मध्ये सांताक्रूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात कोटींची चोरी झाली होती. तेथील सीसीटीव्ही कॅमेर्‍यात मुल्ला कैद झाला होता. दोन वर्षांनंतर याचे धागेदोरे मुंबई पोलिसांना मिळाले आहेत.
पंधरवड्यापूर्वी मुल्लाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने संशयावरून ताब्यात घेतले होते. त्यावेळी तो राहत असलेल्या मिरजेतील बेथेलहेमनगरमधील भाड्याच्या खोलीत तीन कोटी सात लाख 63 हजार पाचशे रुपयांचे घबाड सापडले होते. चार दिवसांच्या चौकशीनंतर त्याने ही रोकड वारणानगर येथून चोरल्याची कबुली दिली होती. हा गुन्हा कोडोली (ता. पन्हाळा) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने सांगली पोलिसांनी हे प्रकरण त्यांच्याकडे वर्ग केले होते. कोडोली पोलिसांनी गेल्या आठवड्यात मुल्लाला ताब्यात घेतले होते. त्याचवेळी मुंबई पोलिसही चोरीच्या गुन्ह्यात संशयित असलेल्या मुल्लाला ताब्यात घेण्यासाठी आले होते. पण सांगलीच्या न्यायालयाने प्रथम कोडोली पोलिसांना त्याचा ताबा दिला. त्यामुळे मुंबई पोलिसांना हात हलवत परतावे लागले होते.
दोन दिवसांपूर्वी मुल्लाच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली होती.त्याला कोल्हापुरातील कळंबा कारागृहात ठेवण्यासाठी सांगली जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले होते. त्याचा ताबा घेण्यासाठी मुंबई पोलिस सांगलीत दाखल झाले होते.न्यायालयाच्या परवानगीने त्यांनी त्याचा ताबा घेतला. सायंकाळी त्याला घेऊन पथक मुंबईला रवाना झाले. सांताक्रूज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सात कोटीची चोरी झाली आहे. तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयित चोरटे कैद झाले आहेत. यातील एका संशयिताचे छायाचित्र मुल्लाशी मिळते-जुळते आहे. त्यामुळे त्याला या चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले आहे.